सोलापूर :
सोलापूर महानगरपालिकेत कंत्राटी कामाचा वारेमाप उपयोग केला जात आहे. आवश्यक, अत्यावश्यक सेवेत सुद्धा कंत्राटदाराकडूनच कामे करून घेतली जात असल्याचा आरोप सोलापूर महानगरपालिका कामगार संघटना कृती समितीने केला आहे. महापालिकेतील कंत्राटी कामांचा सुळसुळाट त्वरित थांबविण्याची मागणी संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे.
महापालिकेच्या साफसफाई, पाणीपुरवठा, शिक्षण, दिवाबत्ती, अग्निशामक दल इत्यादी निरंतर चालू असणाऱ्या विभागात मोठ्या प्रमाणात कंत्राटी कामगार आहेत. रस्ते स्वच्छतेसाठी मशीन आणली तीही भंगारात आहे. कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्या सुरू केल्या. कंत्राटदार कराराप्रमाणे कामगारांशी वागत नाहीत. नियम पाळत नाहीत. याबाबत आयुक्तांना निवेदने देऊनही प्रत्यक्ष चर्चा केली. पण त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्वरित चर्चा करून कंत्राटी कामांचा सुळसुळाट थांबवावा अशी मागणीही निवेदनाव्दारे कृती समितीने केली आहे. कंत्राटी कामगारांकडून आठ तासांपेक्षा अधिक कामे करून घेतली जात आहेत. त्याबदल्यात नियमित महिन्याच्या महिन्याला वेतनही दिले जात नाही. त्यामुळे कामगारांत प्रचंड असंतोष पसरला असल्याचेही सांगण्यात आले.
धमक्या देणे बंद करा
महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांचे कंत्राटदारांवर एवढे प्रेम कशासाठी? कंत्राटदारांनी कराराप्रमाणे किमान वेतन द्यावे, नियमित पगार द्यावा, कामगारांना कामावर काढून टाकण्याच्या धमक्या देऊ नयेत. अन्यथा कामगारांना प्रशासकाच्यासमोर आंदोलन करावे लागेल. याची नोंद घ्यावी, असा इशारा कामगार संघटना कृती समितीचे अध्यक्ष अशोक जानराव यांनी दिला आहे.