साेलापूर - वेळेवर पाणी नसल्यानं महापालिकेकडे तक्रार केली, मात्र महापालिकेने वेळेत काम सुरू केलं नाही. पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालल्यावर चक्क सोलापूर जिल्हा कारागृहातील कैद्यांना जेलच्या बाहेर आणत ड्रेनेजचे खोदकाम करण्यास लावलं. यासाठी जेल परिसरात प्रचंड मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सोलापूरच्या किडवाई चौकात जिल्हा कारागृह आहे. या कारागृहात एकूण ५४० कैदी आहेत. या सर्व कैद्यांना पाणीपुरवठा करण्याकरिता पाणी कमी पडत आहे. पाण्याचे कनेक्शन दोन इंचाचे देण्यात यावे, याकरिता जेल प्रशासनाच्या वतीने १ जानेवारी २०२५ रोजी जेल प्रशासनाच्या वतीने महापालिकेला कनेक्शन वाढवून देण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला होता, मात्र महापालिकेने तो व्यवहार रद्द ठरवला. त्यानंतर पुन्हा एकदा पत्र व्यवहार करण्यात आला. दुसऱ्या कनेक्शन बाबत २८ फेब्रुवारी रोजी पुन्हा जेल प्रशासनाच्या वतीनेअर्ज केला, तरीपण महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केलं, शेवटी कैद्यांच्या पाणीपुरवठ्याकरिता पोलीस प्रशासन आणि जेलमध्ये असलेल्या चार कैद्यांच्या मदतीने स्वतःच किडवाई चौकामध्ये दहा फूट लांबीचे खोदकाम करून नवे कनेक्शन जोडून घेतले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप बाबर, इलाईत तांबोळी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.