सोलापूर: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील पंधरा दिवसांपासून तुरीच्या दरात वाढ होत आहे. सोमवारी उच्चांकी हजार पाचशे रुपयांचा दर मिळाला आहे. मागील दहा दिवसांपूर्वी १० हजार दोनशे रुपयांचा दर मिळाला होता. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याप्रमाणे तुरीचीही आवक वाढत आहे. मागील काही महिन्यांपूर्वी तुरीचा दर आठ हजारांपर्यंत खाली गेला होता. मात्र, यंदा परतीच्या पावसामुळे तुरीला अळ्या लागल्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे यंदा तुरीची दर वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली होती. त्यानुसार मागील महिनाभरापासून तुरीची आवक वाढलेली आहे.
सोमवारी जवळपास ४० गाड्यांची आवक होती. तूरडाळीची मागणी वाढल्यामुळे तुरीच्या दारात वाढ होत आहे. पावसामुळे माल खराब झालेला आहे. त्यामुळे एकरी उतारा कमी निघत आहे; मात्र सध्या मालाला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. सोमवारी झालेल्या लिलावात जवळपास ४०० क्विंटल मालाची आवक होती. त्यात ८६०० ते १०५०० रुपयांपर्यंत दर मिळालेला आहे. सरासरी दर दहा हजारांच्या आसपास असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. अक्कलकोट तालुक्यातील पानमंगरूळ येथील शेतकरी रामचंद्र पोतदार यांच्या पाच पिशव्यांना सर्वाधिक १०,५०० रुपयांचा दर मिळाला आहे. हुडे यांच्याकडून एस.एस. ॲग्रोचे श्रीशैल अंबारे यांनी सर्वाधिक दराने माल खरेदी केली आहे.