सोलापूर : जुना बिडी घरकुल येथील रहिवासी अभिलाष शेराल व त्यांची पत्नी सरिता शेराल (रा. सोनिया नगर, एच ग्रुप) या दोघांनी तेथील नाल्यातील केमिकलच्या दुष्परिणामाबद्दल बोलताना सांगितले. नाल्यातून उग्र वास येताच मुलीचे डोळे लाल होऊन डोळ्यातून पाणी यायला लागते. ती रात्री झोपत नाही. रडत बसते. श्वास घ्यायला तिला त्रास होतो. त्यामुळे तिला काही तरी होईल, या भीतीने आम्ही घर सोडून अक्कलकोट रस्त्यावरील एका आश्रमात आमचा मुक्काम हलवतो. ही एकट्या शेराल कुटुंबीयांची परिस्थिती नाहीय. येथील शेकडो रहिवासी रात्री मास्क लावून झोपतात.
हैदराबाद रस्त्यावरील विडी घरकुलच्या तीन किलोमीटर परिसरात हिरव्या रंगाच्या केमिकलचा परिणाम जाणवत असून, येथे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. चिंचोळी एमआयडीसी येथील एका केमिकल कारखान्यातील केमिकलचे सांडपाणी अक्कलकोट रस्त्यावरील मुद्रा सनसिटी येथील ड्रेनेज मध्ये सोडतात. ड्रेनेजमधील केमिकलचे पाणी बिडी घरकुलमधील नाल्यांमध्ये शिरते. जवळपास तीन किमी परिसरात उग्र वास पसरत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.
कोंडा नगर, गांधी नगर, एसएसआयकॉन, पद्मशाली शिक्षक सोसायटी, उद्योग बँक सोसायटी, युनिक टाऊन, पद्मावती विलाज, पोशम्मा मंदिर, लक्ष्मी चौक, सग्गम नगर, मित्र नगर, शेळगी परिसरातील नाल्यातून गेल्या अनेक दिवसांपासून ॲसिडसारखा वास येत आहे. नाल्यातून उग्र वास येताच येथील अनेकांची धांदल उडते. रहिवासी खिडक्या, दारे बंद करून घेतात. तोंडाला मास्क लावतात. घरातील लहान मुले मात्र भीतीने थरथर कापतात. कारण मुलांना चक्कर यायला लागते. डोळे लाल होऊन चरचर करू लागतात. उग्र वासामुळे लहान मुलांना तसेच वयस्कर नागरिकांना श्वास घ्यायला त्रास होतो. नागरिकांच्या त्रासाबाबत येथील नागरिकांनी मनपा प्रशासन तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदन दिले.