सोलापूर : कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने मोफत कूपन मिळणार असल्याचे सांगण्यात आल्याने जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कामगारांना मुळेगाव रोडवरील हिंदुस्थान स्टील गोडावून येथे कोणीही न आल्याने सकाळपासून रस्ता रोकोचा मार्ग अवलंबवा लागला. यामुळे सोलापूर-हैद्राबाद रोडवरील वाहतूक खंडित झाली. पोलिसांच्या मदतीने ती सुरळीत करावी लागली. मात्र या प्रकारामुळे कामगारांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
बांधकाम कल्याणकारी मंडळाच्यावतीने बांधकाम क्षेत्रातील कामगारांना स्वावलंबी जगता यावे यासाठी बांधकाम साहित्यासह गृहउपयोगी वस्तूंचे कीट देण्यात येते. संबंध जिल्ह्यातील लाभार्थीचा यामध्ये सहभाग असतो. बुधवारी ३ जुलै रोजी सर्व कामगारांना मोफत कूपन मिळणार असे जाहीर करण्यात आल्याने जिल्ह्यातील अनेक कामगार मंगळवारच्या रात्रीच येऊन मुळेगाव रोडवरील हिंदुस्थान स्टील गोडावून समोर येऊन थांबलेले होते. अनेकांनी रात्र इथेच काढली. शहरातील लाभार्थी पहाटेपासूनच आले होते. सकाळी सातपासून कूपन देण्याचे जाहीर करण्यात आले होते, असे लाभार्थ्यांकडून सांगण्यात आले. प्रत्यक्षात १० वाजल्यानंतरही तिथे कोणी फिरकले नाही यामुळे जमाव प्रक्षुब्ध झाला. संतप्त झालेल्या हजारो लोकांनी मुळेगाव रोडचा कब्जा घेऊन रस्ता रोको आंदोलन सुरु केले. हायवेवरील वाहतूक रोखली गेल्याने सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी जमावाला रोडवरुन हटवून वाहतूक सुरळीत केेली.
दर बुधवारी दिले जाते कूपनदर बुधवारी हे कूपन देण्यात येते. गेल्या आठवड्यात बुधवारी १० हजार कूपनचे वाटप करण्यात आले होते. कूपनवर कीट केव्हा मिळणार याच तारीख नमूद केलेली असते. त्याप्रमाणेच ३ जुलै रोजी ही कूपन मिळणार म्हणून गर्दी केल्याचे सांगण्यात आले. या कीट मध्ये ३० गृहउपयोगी भांड्याचा समावेश असल्याचे लाभार्थीपैकी जमीर शेख यांनी सांगितले.