सोलापूर : जुन्या पेन्शनसह विविध मागण्यांसाठी करण्यात आलेल्या बेमुतद संपा दरम्यान सोमवारी सकाळी थाळीनाद आंदोलन करण्यात आले. दुपारी शासनाने तत्वता मागण्यांना मंजूरी दिल्यामुळे अखेर सायंकाळी संप मागे घेण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी एकत्र येवून जल्लोष केला.
जुनी पेन्शन योजना लागू करा, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, सर्व रिक्त पदे अग्रक्रमाने भरा, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे निरसित करू नका, अनुकंप तत्वावर वारसांना विनाअट नियुक्ती द्या, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनांचा लाभ घ्या आदी मागण्यांसाठी विविध कामगार संघटनांच्या वतीने बंमुदत संप पुकारण्यात आला होता. १४ मार्च पासून हा संप सुरू होता. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या पद्धतीने कर्मचारी आंदोलन करीत होते. मागील सात दिवसांपासून संप पुकारला होता. अखेरीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर या संपावर तोडगा निघाला आहे.
सरकारी कर्मचारी संघटनेनं आपला संप मागे घेतला आहे. आज राजपत्रित अधिकाऱ्यांनी २८ मार्चपासून संपात प्रत्यक्ष सामिल होण्याचा इशारा दिला होता. जुनी पेन्शन योजना लागू करा ही कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचारी संघटनेला विधान भवनात बैठकीसाठी बोलावलं होतं. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आणि कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. जुनी पेन्शन योजना लागू होईल, असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं आहे. त्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या मंगळवारपासून सर्व कर्मचारी कामावर रूजू होणार आहेत.