काशिनाथ वाघमारे, सोलापूर : बार्शी शहरात भवानी पेठ येथे सरताज मुलाणी यांनी घराजवळ लावलेली दुचाकी रात्री दोघांनी पेटवून दिल्याचा प्रकार घडला. दरम्यान फिर्यादी महिलेने आरडाओरड करताच त्या दोघांनी तेथून पळ काढला. या घटनेत गाडीचे ४० हजारांचे नुकसान झाले असून बार्शी शहर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
ही घटना ११ मे रोजी रात्री १२ वाजेच्या दरम्यान घडली असून याबाबत सरताज यांची आई हसीना दस्तगीर मुलाणी (५०, रा. भवानी पेठ, बार्शी) यांनी बार्शी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी उमेश शेट्टी व सोनू वायकर (दोघे रा.मंगडे चाळ, बार्शी) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलीस सूत्राकडील माहितीनुसार फिर्यादीचा हसीना यांचा मुलगा सरताज याने दिवसभरातील काम संपवून फिर्यादी रहात असलेल्या बोळात (एम.एच. १३/ डी. पी. ४९२३) ही दुचाकी लॉक करून ठेवली होती.
जेवण आटोपून सारेजण झोपी गेले आणि रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर कशाचा तरी आवाज येताच हसीना बाहेर आल्या. पाहिले असता वरील दोघेजण दुचाकी जवळ उभे राहून आग लावत असल्याचे दिसले. तिने दोन्ही मुलाला आवाज देऊन बाहेर बोलावताच समाजकंठकांनी तेथून पळ काढला. दरम्यान दुचाकी जळून खाक झाली. याचा पुढील तपास पोलीस हवालदार भांगे करत आहेत .