सोलापूर : मागील काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु झालेल्या युद्धाची झळ विद्यार्थ्यांना बसत आहे. सोलापुरातील १४ विद्यार्थी हे डेनप्रोमधील बंकरमध्ये आहेत. जवळपास असलेल्या मॉलमधील साहित्य संपल्याने त्यांच्या जेवणाचे हाल होत आहेत.
सोलापुरातील ३१ विद्यार्थी हे युक्रेनमध्ये शिकत आहेत. त्यापैकी चार विद्यार्थी हे सोलापुरात पोहोचले आहेत. तर, अजूनही २८ विद्यार्थी हे युक्रेनमध्येच आहेत. त्यातील १४ विद्यार्थी हे डेनप्रो शहरात आहेत. यापूर्वी फक्त सायरन वाजल्यानंतर विद्यार्थी बंकरमध्ये येत होते. आता मात्र पूर्णवेळ बंकरमध्येच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना बंकरमध्ये असलेल्या छोट्याशा जागेत थांबावे लागत आहे. एका विद्यार्थ्यापुरती गादी खाली टाकण्यात आली असून त्यावरच त्यांना दिवस घालवावा लागत आहे. पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये, म्हणून विद्यार्थ्यांनी पाण्याचे जार आणून ठेवले आहेत.
शहरात असलेल्या मॉलमध्ये मुले खाण्याचे साहित्य आणण्यास गेले होते. मात्र, तिथल्या मॉलमधील खाण्याचे साहित्य आधीच संपले आहे. सध्या विद्यार्थ्यांकडे आणखी काही दिवस पुरेल इतका खाण्याच्या वस्तूंचा साठा आहे.
डेनप्रो शहरात वाढली गर्दी
युक्रेनमधील कीव्ह व खार्कीव्ह या शहरांत रशियाने हल्ले केले आहेत. या हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी तिथले नागरिक हे डेनप्रो शहरात येत आहेत. अधिक लोक आल्याने डेनप्रोमध्ये गर्दी वाढली आहे. त्यामुळे आता डेनप्रो शहरावर हल्ल्याची शक्यता वर्तविली जात आहे. याच शहरात सोलापूरचे १४ विद्यार्थी असून त्यांना पूर्णवेळ बंकरमध्ये राहावे लागत आहे.
लाजीनाने चिप्सवर काढला दिवस
दक्षिण सोलापुरातील लाजीना सय्यद ही रोमानिया विमानतळावर पोहोचली आहे. एअरपोर्टवर खाण्याचे साहित्य संपल्याने तिने फक्त चिप्सवरच दिवस काढला आहे. लाजीना सय्यद हीची भारतात येण्याची सोय झाली आहे. ती सोमवारी रात्री ९.३० वाजता विमानात बसणार आहे. मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुंबईत पोहोचणार आहे.