सोलापूर : लोकसभा निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथे धाड टाकून, पोलिसांनी एक लाख ४ हजार ५०० रूपये किंमतीचे दोन हजार लिटर हातभट्टी दारू नष्ट करण्यात आली. ही कारवाई सोलापूर तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने केली.
तालुका पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी २९ फेब्रुवारी रोजी चोरून अवैधरित्या गावंठी हातभट्टी दारू तयार करणा-या इसमावर ऑपरेशन परिवर्तनच्या अनुषंगाने मुळेगाव तांडा शिवारात पेट्रोलिंग करीत होते. मुळेगाव तांडयाच्या पुर्व बाजुस असलेल्या चिल्लारीच्या झाडाझुडपाच्या आडोशाला अवैधरित्या हातभट्टी दारू तयार असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी छापा टाकुन कारवाई केली. कारवाईत दोन हजार लिटर गुळमिश्रीत रसायन, १० प्लॅस्टीक बॅरेलमध्ये भरून ठेवलेली गावंठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, हातभट्टी उध्दवस्त करून प्लॅस्टीक बॅरेल जागीच फोडुन गुळमिश्रीत रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले.
मुळेगाव तांडा येथे चोरून अवैध गावंठी दारूची हातभट्टी तयार केल्याप्रकरणी एका विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायद्या कलम ६५ फ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हातभट्टी दारू प्रकरणी संबंधित इसमा विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये कारवाई करून, त्याचे अभिलेख पडताळुन योग्य त्या कलमान्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत देवळेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग यांनी सांगितले.