सोलापूर : वावटळीत पालासकट झोळी हवेत उंच उडून खाली कोसळली. या दुर्देवी घटनेत डोक्याला गंभीर इजा होऊन झोळीत झोपलेली दीड वर्षाच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला. तिचा मृतदेह पाहून घटनास्थळी तिच्या आई-वडिलांसह आजोबा आणि नातेवाईकांनी एकच टाहो फोडला अन उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले.
कस्तुरा साधू चव्हाण (रा. सोनंद, ता. सांगोला) असे मृत चिमुरडीचे नाव असून गुरुवार, २७ एप्रिल रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास सांगोला तालुक्यात जवळा येथे लेंडी ओढ्यात ही घटना घडली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दीपक साळुंखे यांनी दुर्घटनेची माहिती घेऊन चव्हाण कुटुंबियांना धीर दिला.
सोनंद येथील साधू अण्णा चव्हाण हे पत्नी व चिमुरडी कस्तुराला सोबत घेऊन गुरुवारी सकाळी जवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता आले होते. उपचारानंतर पती-पत्नी, मुलगी हे मिळून आजोबा रमेश भीमा निंबाळकर यांच्या जवळा- घेरडी रस्त्यावर लेंडी ओढ्याच्या पटांगणात टाकलेल्या पालावर आले.
तेथे सासुरवाडीचा पाहुणचार घेतला. बाहेर उन्हामुळे पती-पत्नी पालात विश्रांती घेत होते तर मुलगी कस्तुरा पालातच झोपली होती. दरम्यान दुपारी अडीच्या सुमारास अचानक जोरदार वावटळ सुटली. या वावटळीत झोळीसह पाल उंच हवेत उडाली आणि पालासकट झोळी खाली कोसळली. कस्तुरा खाली पडून तिच्या डोक्याला गंभीर इजा झाली. तिला उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.प्रशासन हलले...दरम्यान, घटनेची माहिती मिळताच निवासी नायब तहसीलदार किशोर बडवे, सरपंच सुषमा घुले, तंटामुक्तीचे अध्यक्ष अरुण घुले, पोलीस पाटील अतुल गयाळी, तलाठी विकास माळी यांनी घटनास्थळी भेट दिली. पीडित कुटुंबाला धीर देऊन घटनेचा पंचनामा करून शासकीय मदतीसाठी सांगोला तहसील कार्यालय येथे पाठवून दिले.