केवळ बोट दाखवून, नावे ठेवून राजकारण करणे योग्य होणार नाही. पाण्याचा विषय सर्व पक्षांना विश्वासात घेऊन सोडवणे हे अधिक चांगले. चर्चेने प्रश्न सुटतात. ज्याला शेती, विहीर आहे, ज्याच्याकडे पाईपलाईन आहे, त्याने चंद्रभागेच्या पाण्यावर जरूर भांडावे. कोरोना साऱ्या जगाला भयभीत करीत असताना थोडे राजकारण बाजूला ठेवून दुबळ्या गरीब माणसाला लस कशी मिळेल, तो सुरक्षित कसा होईल, देवाचा अवतार होऊन गरिबाच्या दारात कसे जाता येईल, याबाबत विचार करण्याची आता वेळ आहे. कधी औषधासाठी तर कधी लस प्राप्तीसाठी धनिक लोक वणवण करीत आहेत. एकूणच कोरोना झोपडीकडे वळण्यापेक्षा अलिशान सोसायटीमध्येच वावरताना दिसत असल्याचेही प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी सांगितले.
भीमा प्रकल्पासाठी अनेकजण विस्थापित झाले आहेत, अशा धरणग्रस्तांचाही पाण्यावर अधिकार आहे. पाण्यासाठी जुना वाद उकरून काढण्यापेक्षा सर्वच लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कृष्णा-भीमा स्थिरीकरणाला चालना देणे, गतिमान करणे गरजेचे असल्याचेही प्रा. ढोबळे म्हणाले.