शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघाच्या विजयनगर येथील मुख्य इमारतीत ही दूध भेसळ ओळखणारी मशीन बसविण्यात आली. या मशीनच्या उद्घाटनप्रसंगी आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, आ. राम सातपुते, शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील, संचालक दत्तात्रय भिलारे, भगवानराव साळुंके, हरिभाऊ मगर, संग्रामसिंह रणनवरे, भागवत पिसे, कार्यकारी संचालक रविराज इनामदार देशमुख व खातेप्रमुख उपस्थित होते.
शिवामृत दूध संघाने महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्या., मुंबई व केंद्र शासनाच्या सहकार्याने टेक्नॉलॉजी बेस्ड मिल्क ॲनालायझर मशीन घेतली आहे. याद्वारे दुधातील २४ प्रकारची भेसळ तपासणी केली जाणार आहे. टेक्नॉलॉजी बेस्ड मिल्क ॲनालायझर मशीन बसविणारा शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघ हा राज्यातील पहिला दूध संघ असल्याचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सांगितले.
यांची होणार मशीनद्वारे तपासणी
ही मशीन दुधातील फॅट, एस.एन.एफ., प्रोटीन, टी. एस., लॅक्टिक ॲसिड, लॅक्टोज, अमोनियम सल्फेट, डिटर्जंट, व्हेज ऑईल, ग्लुकोज, लो-लॅक्टोज, गॅलाक्टोज, फार्माडिहायड्राईड, माल्टोडेक्स्ट्रीन, मेलामाईन, सॉल्ट, सोडियम कार्बेनेट, सोडियम सायट्रेट, सॉर्बिटोल, स्टार्च, सुक्रोज, युरिया, आदी २४ तपासण्या केल्या जाणार असल्याचे शिवामृतचे कार्यकारी संचालक रवींद्र इनामदार-देशमुख यांनी सांगितले.