आप्पासाहेब पाटील
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसूतिगृह अत्याधुनिक करण्यात आले आहे. याठिकाणी आवश्यक तेवढे डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. फाइव्ह स्टार ऑपरेशन थिएटर अन् स्मार्ट आयसीयू सेंटर असलेले हे महापालिकेचे रुग्णालय असणार आहे. याठिकाणी दररोज सुमारे ५० महिलांच्या प्रसूती मोफत होतील, असा अंदाज आयुक्त शीतल तेली-उगले यांनी व्यक्त केला आहे. या प्रसुतीगृहाचे उदघाटन शुक्रवार २४ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसूतिगृह नूतनीकरणाचे काम बालाजी अमाईन्सच्या मदतीने पूर्ण झाले. काम पूर्ण झाल्यानंतर बालाजी अमाईन्स कंपनीकडून व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक सोयी-सुविधांयुक्त इमारत महापालिकेच्या ताब्यातही दिली असल्याचे डॉ. बसवराज लोहारे यांनी सांगितले.
या महापालिकेच्या रूग्णालयात अद्ययावत प्रसूतिगृह, लेबररूम, नवीन साहित्य व मशीन, दोन मोठे वार्ड, हॉस्पिटलकरिता नवीन मशीन व साहित्य, गरोदर महिलांना पायरी चढताना त्रास होऊ नये म्हणून लिफ्टची सोय, हॉस्पिटलमधील ऑपरेशन थिएटर व लेबररूमकरिता मेटा फ्लेक्स कंपनीचे आधुनिक एअरलॉक दरवाजे, संपूर्ण प्रसूतिगृहाचे फ्लोअरिंग बदलले. स्वच्छतागृहाचे बांधकाम, रंगकाम, अद्ययावत प्रसूतिगृह, अद्ययावत शस्त्रक्रिया विभाग, ॲल्युमिनियम पार्टीशन करून आधुनिक वार्डची रचना केली आहे.