सोलापूर/सांगोला :सततच्या हवामान बदलामुळे सांगोला तालुक्यातील केशर आंबा बागांवर पडलेल्या भुरी व तुडतुड्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मोहोर गळती वाढल्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. तर महागडे औषधे बागांवर फवारणी करूनही रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्याचे नावच घेत नाही. त्यामुळे सततच्या फळ गळतीमुळे यंदा आंबा उत्पादन घटणार असल्याचे संकेत शेतकऱ्यांनी दिले आहेत.
सांगोला तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील डाळिंब मर, तेलकट व पिन होल बोरर या रोगाच्या प्रादुर्भावामुळे नष्ट होऊ लागले त्यामुळे डाळिंब रोगावर वैतागलेल्या शेतकऱ्यांनी डाळिंब बागा काढल्या व पीक पद्धत बदलून केशर आंबा, तैवान पेरू, गोल्डन सिताफळ ,आवळा ,पपई, कलिंगड ,खरबूज असे फळ लागवडीकडे वळला आहे. सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुमारे १ हजार हेक्टर क्षेत्रावर केशर आंबा लागवड केली आहे. चालू वर्षी नोव्हेंबर मध्ये बागांना पहिला मोहोर निघाला. परंतु तो फारसा तग धरू शकला नाही. त्यानंतर हवामान बदलामुळे डिसेंबर व फेब्रुवारी मध्ये दुसऱ्या बहारात मोहोर निघाला. बागा मोहोराने बहरलेल्या असताना भुरीमुळे मोहोर पांढरा पडून तर तुडतुड्या रोगामुळे बागेवर चिकटपणा येऊ लागल्याने फळे गळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे. एकीकडे डाळिंब उध्वस्त झाल्या असताना दुसरीकडे शेतकरी फळपीक बदलून उभारी घेण्यासाठी धडपडत आहे. अशातच केशर आंबा बागांवर पडणाऱ्या रोगामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.
बागेवर १४ फवारण्या करूनही गळती थांबेनामहूद येथील प्रयोगशील शेतकरी दिलीप नागणे यांनी २ एकर क्षेत्रावर केशर आंबा लागवड केला आहे. यंदा हवामान बदलामुळे डिसेंबर व फेब्रुवारी झाडांना मोहोर येण्यास सुरुवात झाली मात्र मोहोराने झाडे बहरली असताना बागेवर भुरी व तुडतुड्या रोगाच्या प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून आले म्हणून त्यांनी रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी आत्तापर्यंत बागेवर १४ फवारण्या करुनही फळ गळती थांबत नाही.त्यामुळे यंदा आंब्याचे उत्पादन घटणार असल्याचे नागणे सांगितले.शेतकऱ्यांनी आंबा मोहोर संरक्षणासाठी हेक्झाकोनझोल १० मिली किंवा बावीस्टीन १० ग्राॅम प्लस योग्य किंवा क्विनाॅलफाॅस-१५मिली प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे बागेवर फवारणी करावी. -शिवाजी शिंदे, तालुका कृषी अधिकारी