मंगळवेढा : महुद बु॥-पंढरपूर रस्त्यावर मंगळवार २ एप्रिल रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास खिलारवाडीपाटीजवळ चौघांनी चाकूचा धाक दाखवून दुचाकीवरील युवकास लुटलेल्या घटनेचा तपास लावण्यात सांगोला पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अजिनाथ कोंडिराम जाधव (रा. पंढरपूर) याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून अनेक गुन्ह्याच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पो. नि. दयानंद गावडे यांनी सांगितले. गार्डी (ता. पंढरपूर) येथील सत्यवान शहाजी अनपट हा २ एप्रिल रोजी पंढरपूर येथून (क्र. एम.एच.१३/बी. एस.0५७१) दुचाकीवरुन गार्डीकडे निघाला होता. खिलारवाडी पाटीजवळ अचानक पाठीमागून आलेल्या विनानंबर व पांढर्या रंगाच्या मारुती ओमनी कारने दुचाकीला धडक देऊन खाली पाडले. यावेळी दुचाकीवरुन कोसळलेल्या सत्यवान अनपट यास कारमधील अनोळखी चौघांनी चाकूचा धाक दाखवून मोबाईल हँडसेट, रोख रक्कम २०० व दुचाकी घेऊन पसार झाले होते. याबाबत सत्यवान अनपट यांनी अज्ञात चौघांविरुद्ध पोलिसात फिर्याद दिल्यावरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात सत्यवान अनपट यांच्या चोरीस गेलेल्या मोबाईलचे लोकेशन पोलिसांना पंढरपूरमध्ये मिळून येत होते. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोबाईलच्या कॉल डिटेल्स वरुन सूरज मिलनसिंह रजपूत यास ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता रजपूत याने सदरचा मोबाईल अजिनाथ जाधव याने वापरण्यास दिल्याचे सांगितले. चोरलेल्या दुचाकीचे साहित्य सोडवून त्याच्या घराच्या बाजूमधील खोलीमध्ये ठेवलेले काढून दिले आहे. शिवाय गुन्ह्यात वापरलेली कार विक्री केली होती. पोलिसांनी विक्री केलेली कार हस्तगत केली आहे. या गुन्ह्यातील इतर तीन आरोपींनी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत जबरी चोर्या केल्यामुळे अटकेत आहेत. लवकरच न्यायालयातून ट्रान्सफर वॉरंट वरुन त्या तिघांनाही ताब्यात घेऊन इतर गुन्ह्यात सहभाग आहे का याची चौकशी करणार असल्याचे पो.नि.गावडे यांनी सांगितले.
-----------------
जबरी चोरीच्या गुन्ह्याची कबुली ४पोलिसांनी चोरलेल्या मोबाईलच्या आधारे या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अजिनाथ कोंडिराम जाधव (रा. कैकाडी महाराज मठाजवळ पंढरपूर) यास ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता खिलारवाडीपाटीजवळील जबरी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली.