सोलापूर: लैंगिक अत्याचाराच्या खटल्याच्या सुनावणीत न्यायालयात साक्ष देताना अत्याचार पीडित बालिका साक्ष देताना अचानकपणे चक्कर येऊन खाली कोसळली. त्यामुळे सरकारी वकिलांच्या विनंतीवरुन न्यायालयाने खटल्याचे कामकाज तात्पुरते स्थगित केले. पीडित बालिकेची मानसिक स्थिती ठीक झाल्यानंतर न्यायालयाचे कामकाज सुरळीत करण्यात आले. अति. सत्र न्यायाधीश आर.व्ही. सावंत वाघुले यांच्यासमोर ही सुनावणी झाली.
उत्तर सोलापूर तालुक्यातील एका मोठ्या गावात सदरची बालिका आपल्या आई-वडिलांसमवेत राहत होती. ३१ आॅक्टोबर रोजी आरोपी आकाश किसन आडगळे याने बालिकेवर अत्याचार केला. ही घटना त्या बालिकेने आईला सांगितली. त्यानंतर तिच्या आईने सोलापूर तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली.
या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. सावंत-वाघुले यांच्या न्यायालयात सुरु आहे. यात पीडित बालिका साक्ष देतानाच तिला अचानक चक्कर आली आणि खाली कोसळली. लागलीच खटल्याचे कामकाज तात्पुरते तहकूब केले. बालिकेची मानसिक स्थिती ठीक झाल्यानंतर न्यायाधीशांच्या निजी कक्षात दुपारच्या सत्रात सुनावणी घेतली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत, मूळ फिर्यादीतर्फे अॅड. जयदीप माने तर आरोपीतर्फे अॅड. बायस काम पाहत आहेत. या खटल्यातील आरोपीवर अन्य एका लैंगिक अत्याचाराचा खटलाही न्यायालयात दाखल झाला आहे. या दुसºया खटल्याचीही सुनावणी याच न्यायालयात सुरु आहे.