करमाळा : प्रेयसीला करमाळ्यात आणून घर करून दिले आणि तिचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अमोल सदाशिव शिंदे (रा. देवळाली, ता. करमाळा) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदला आहे. दरम्यान, मयतेस कोरोना झाल्याचे सांगून परस्पर अंत्यसंस्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सदरचा गुन्हा मरण पावलेल्या तरुणीच्या आईच्या अर्जाच्या चौकशीनंतर दाखल झाला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सचिन सुधाकर जगताप यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार देवताबाई अनिल आदमाने (रा. जिजाऊनगर, ता. रिसोड, जि. वाशिम) या महिलेने तक्रारी अर्ज दिला होता. त्यामध्ये तिची मुलगी माधुरी (वय २६, रा. फुलारीमळा, गणेशनगर, करमाळा) हिचे अमोल सदाशिव शिंदे याच्याशी प्रेमसंबंध होते. ती नवऱ्याचे घर सोडून प्रियकर अमोलसोबत करमाळ्यात रहावयास आली होती. २४ मेपासून तिचा फोन आला नाही. ती भेटत नसल्याने तिच्या आईने करमाळा पोलिसात तक्रार अर्ज दिला. पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी अर्जाची चौकशी सहायक पोलीस निरीक्षक जगताप यांच्याकडे साेपवली. या चौकशीत माधुरी व अमोल शिंदे यांच्यात चार वर्षापासून प्रेमसंबंध असल्याचे उघडकीस आले. सुरुवातीला त्याने तिला यवत (जि.पुणे) येथे भाड्याची खोली करून ठेवले होते. त्यानंतर वर्षभरापासून तिला करमाळा येथे आणले होते. तिला सात वर्षाची मुलगी आहे. गेल्या काही दिवसापासून तो तिचा मानसिक व शारीरिक छळ करीत होता. याला कंटाळून तिने २५ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता बाथरूममध्ये विषारी औषध प्राशन करून बेशुद्ध झाली. त्यानंतर अमोल शिंदे याने तिला उपचारासाठी डॉ. जवळेकर यांच्या दवाखान्यात नेले. डॉक्टरने तिला मृत घोषित केले.
---
मृतदेहाची लावली विल्हेवाट
तिला मृत घोषित केल्यानंतर डॉक्टरांनी सरकारी दवाखान्यात घेऊन जाण्यास सांगितले. परंतु त्याने डॉक्टर व पोलिसांना माहिती न देता कोरोना झाला आहे, अशी परस्पर बतावणी करून नगर परिषद कर्मचारी, बारा बंगल्याजवळील स्मशानभूमी येथे घेऊन जाऊन अंत्यविधी करून पुरावा नष्ट केला आहे.