सोलापूर : अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही ग्रामस्थांनी कर्नाटकात समाविष्ट करण्याची मागणी केली. सोलापूर जिल्ह्यात शिरलेल्या या सीमावादाला जाणीवपूर्वक चिथावणी देण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी केला. ही चिथावणी कुणी दिली हे सांगता येणार नाही. मात्र, जिल्ह्याची एकजूट कायम राहील, असा विश्वास जिल्ह्यातील नेत्यांनी व्यक्त केला.
कर्नाटक हद्दीत मंगळवारी महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ले झाले. या वादावर शरद पवार यांनी मंगळवारी मुंबईत भाष्य केले. यात त्यांनी सोलापूर जिल्ह्याचा उल्लेख केला. या जिल्हात नव्याने पुढे आलेल्या मागणीला काही लोकांचा पाठिंबा असावा, जाणीवपूर्वक चिथावणी दिल्याचा आरोपही पवारांनी केला. आपण पालकमंत्री होतो त्या काळात अशा प्रकारची मागणी पुढे आलेली नव्हती, असेही पवार म्हणाले. यावरून जिल्हा नियोजन समिती, जिल्हा परिषदेचे निधी वाटप आणि सध्याच्या भाजपच्या पालकमंत्र्यांची भूमिकाही चर्चेत आली.
अक्कलकोटच्या सीमावर्ती भागातील ग्रामस्थांचा | कर्नाटकातील गावांशी संपर्क येतो. कर्नाटक 'सरकार या ग्रामस्थांनी सतत प्रलोभने दाखवीत असते. पण आजवर कुणीही आम्हाला कर्नाटक जायचे असे म्हटलेले नव्हते. या भागात रस्ते, पाणी, वीज, शाळा या मूलभूत समस्यांवरून नाराजी सुरु आहे. या वादाच्या निमित्ताने या समस्या दूर करण्याचा प्रयत्न हे ग्रामस्थ करीत आहेत. त्यामुळे या समस्या दूर करणे तातडीने गरजेचे आहे. देगाव जलसेतू व इतर कालव्यांच्या कामाला निधी मिळावा यासाठी आम्ही यापूर्वी प्रयत्न केले. सीमावादाला कोण चिथावणी देतेय असे म्हणता येणार नाही.- सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार, अक्कलकोट
काय म्हणाले होते शरद पवार
सोलापूरचा मी सात आठ वर्षे पालकमंत्री होतो. मला सोलापूरची संपूर्ण माहिती आहे. आणि हा प्रश्न माझ्या कालखंडामध्येमध्ये कधी कुणी मांडला नाही. जत असेल की गुजरातची सीमा असेल हे प्रश्न कोणी मांडले नव्हते. आता कुणीतरी जाणीवपूर्वक चिथावणी देण्याचे प्रकार करतेय. राज्य सरकार बघ्याची भूमिका घेतेय. या भागातील लोकांच्या ज्या समस्या असतील, आम्ही त्यांना भेटू. महाराष्ट्रातील खासदार आहेत त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कानावर ही घटना घालावी, असे पवार म्हणाले.
चिथावणी कोण देतंय, हे सांगता येणार नाही. मात्र काही लोकांची मने विचलित करून विकासाच्या विषयांकडे दुर्लक्ष करण्याचे प्रकार सुरु आहेत. जिल्ह्यातील एक इंचभर जागा जाणार नाही, यासाठी सर्वांनी एकजूट करायची आहे.- आमदार सुभाष देशमुख, सोलापूर दक्षिण.