माघी यात्रा काळात पावती व ऑनलाईन दर्शनाच्या माध्यमातून १३ लाख रुपयांची देणगी मिळाली आहे तर हुंडापेटी व परिवार देवतांच्या चरणी ४३ लाख रुपयांचे दान जमा झाले. भक्तनिवास ८ लाख रुपये तर इतर ४ लाख अशी ६८ लाख रुपयांची देणगी जमा झाली आहे. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन करण्यात आला होता. यादरम्यान आषाढी यात्रा व कार्तिकी यात्राही रद्द करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी वारकऱ्यांना पंढरपुरात प्रवेश बंदी होती.
यावर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माघी यात्रा रद्द करण्यात आली. त्यातच यात्रेच्या दिवशी पंढरपुरात व श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिर परिसरात संचारबंदी लागू होती. त्यामुळे भाविकांविना माघी सोहळा साजरा करण्यात आला. तरीही देशभरातील भाविक व वारकऱ्यांनी घरी राहून माघी यात्रा सोहळा साजरा करत पावती आणि ऑनलाईनच्या माध्यमातून १३ लाखांची देणगी जमा केली आहे. माघी यात्रा कालावधीत मंदिरातील विविध हुंडी आणि परिवार देवतांच्या दानपेटीत ४३ लाख रुपये जमा झाले आहेत.
गेल्या वर्षी माघी यात्रेत तब्बल २ कोटी ९० लाख रुपयांची देणगी मिळाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी फक्त ६८ लाखांची देणगी मिळाली असल्याचे समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जाेशी यांनी सांगितले.