अकलूज - तीन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर नीरा खोऱ्यात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. यामुळे वीर-भाटघर, नीरा देवघर व गुंजवणी धरणांतील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास वीर धरण दरवाजा क्र. ५ साडेचार फुटांनी उचलून नीरा नदीत ४,६३७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. पावसाचा जोर वाढल्याने धरण १०० टक्के भरल्यामुळे दु. ४ वा. ९,२७४ क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला.
दरम्यान, दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्याने रात्री ८ वाजता वीर धरणातून पुन्हा ९२७४ क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने धरणातुन २४,३८५ क्युसेक व उजवा कालवा विद्युतगृहातून ९०० क्युसेक, डावा कालवा विद्युतगृहातून ३०० क्युसेक असा एकूण २४,३८५ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सुरू आहे.यामुळे वीर धरण प्रशासनाने नीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
यंदाच्या पावसाळ्यात जून व जुलै महिन्यातील पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाने दडी मारल्यानंतर गत महिन्यात नीरा खोऱ्यात ६ जुलैला पावसाला प्रारंभ झाला होता. नीरा खोऱ्यातील वीर, भाटघर, नीरा-देवघर व गुंजवणी या चार धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होत गेली. १५ जुलै रोजी वीर धरण ९२ टक्के भरल्यानंतर धरणातून नीरा नदीत टप्प्याने पाणी सोडण्यात आले होते. १९ जुलैला पावसाचा जोर ओसरल्याने नीरा नदीत पाणी सोडण्याचे बंद केले होते. तब्बल तीन आठवडे पावसाने दडी मारल्यानंतर गत दोन दिवसापासून नीरा खोऱ्यात पावसाचे आगमन झाले.
दोन दिवसाच्या पावसाने वीर, भाटघर, नीरा-देवघर व गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या पाण्यामुळे चारही धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. यामुळे वीर धरणाच्या गेट क्र. ५ मधून ४,६३७ क्युसेक, उजवा कालव्यातील विद्युतगृहातून ९०० क्युसेक व डावा कालव्यातील विद्युत गृहातून ३०० क्युसेक असा एकूण ५ हजार ७३७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सकाळी ९ वाजता नीरा नदीत सोडला. दुपारी पावसाचे प्रमाण वाढल्याने रात्री ८ वा. पाण्याच्या विसर्गात वाढ करून १३ हजार ९११ क्युसेक पाणी विसर्ग वाढविल्यामुळे दरवाजा क्र.४, ५ व ६ मधून २४,३८५ क्युसेक इतका विसर्ग नीरा नदी सोडला आहे. नीरा नदीच्या काठावरील गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.