सोलापूर : ज्ञानरचनावादी शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाची गोडी वाढविण्यासाठी भू. म. पुल्ली शाळेत शिक्षण जत्रेचे आयोजन करण्यात येते. विविध स्टॉलच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्यांचे प्रदर्शन आयोजित के ले जाते. हे शैक्षणिक साहित्य स्वत: मुलींनी बनविलेले असते.
भू. म. पुल्ली शाळेमध्ये शिकणाºया विद्यार्थिनी या यंत्रमागधारक, विडी कामगारांच्या मुली असतात. या विद्यार्थिनींमध्ये शिक्षणाची गोडी वाढविण्याची गरज ओळखून शाळेत विविध प्रयोगशील उपक्रम राबविले जातात. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनी या शैक्षणिक साहित्य तयार करतात. जत्रेमध्ये उभारण्यात आलेल्या स्टॉलमधून विद्यार्थिनी साहित्यांविषयी माहिती सांगतात. जात्यावरील गाणे, अभंग, ओव्या आदीदेखील या उपक्रमात सादर करण्यात येतात. गणिताचे प्रमेय सोप्या पद्धतीने समजाविण्यासाठी त्याचे मॉडेलही तयार करण्यात येते. माय मराठी, राष्ट्रभाषा हिंदी, येस आय कॅन, निरसतेकडून सरसतेकडे, विज्ञान समजून घेताना, आनंददायी शिक्षण, कृतियुक्त अध्ययन आदी स्टॉलची उभारणी करण्यात येते.
राष्ट्रीय बालविज्ञान परिषद यांच्या अंतर्गत घेण्यात येणाºया स्पर्धेत जिल्हा, विभागस्तरीय स्पर्धेत प्रशालेने मातीविना शेती हा प्रयोग सादर केला होता. या प्रयोगाला बक्षिसेही मिळाली. विविध प्रकारच्या पाच कुंड्यांमध्ये बिया टाकण्यात आल्या होत्या. विडी करण्यासाठी लागणाºया तेंदू पानाच्या वापराने पीक घेता येते, हे प्रयोगाने सिद्ध केले होते.
पालकांसाठी विविध स्पर्धा, पाककला स्पर्धा, आरोग्य शिबिरे आदी उपक्रमही घेण्यात येतात. पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ गड्डम, उपाध्यक्ष प्रा. श्रीनिवास कोंडी, सचिव दशरथ गोप, सहसचिव संगीता इंदापुरे, खजिनदार नागनाथ गंजी हे मार्गदर्शन करत असल्याचे मुख्याध्यापिकांनी सांगितले. संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येतात. शिवाय संस्कारक्षम शिक्षण देण्यासाठी उपमुख्याध्यापक युवराज मेटे, पर्यवेक्षिका कल्पना येमूल आदी प्रयत्नशील असतात, असेही सांगण्यात आले़
मदतीसाठी विद्यार्थ्यांचे सतत हात पुढे- नवरात्रात बतुकम्मा हा कार्यक्रम घेण्यात येतो. यात विद्यार्थिनींसोबत त्यांच्या मातांनाही सहभागी करून घेण्यात येते. विद्यार्थिनींकडून ममता मूकबधिर विद्यालय, दमाणी अंधशाळेतील विद्यार्थ्यांना राखी पौर्णिमेनिमित्त राखी बांधण्यात येते. केरळ पूरग्रस्तांसाठी विद्यार्थिनींनी खाऊच्या पैशांतून २५ हजार रुपयांची मदत केली़ यात कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींंनी सहभाग घेतला होता.
शाळेत सर्व विषयांचे शिक्षण हे ज्ञानरचनावादी पद्धतीने दिले जाते. यामुळे विद्यार्थिनींना शिकवणी लावण्याची गरज नाही. आमच्या शाळेच्या जास्तीत जास्त उपक्रमात विद्यार्थिनींंसोबतच पालकांचाही सहभाग असावा, यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करत असतो.- गीता सादूल, मुख्याध्यापिका, भू. म. पुल्ली प्रशाला.