मंगळवेढा : मंगळवेढा शहर व परिसरात बुधवारी सायंकाळपासून गुरूवारी सकाळी ९ वाजेपर्यंत ढगाळ वातावरण व रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे ज्वारी, द्राक्ष व डाळिंब बागायतदार यांच्या चिंतेत भर पडली. मात्र, दुपारनंतर ऊन पडल्यामुळे ज्वारीला या हवामानाचा कसलाही धोका नसल्याने ज्वारी काढणीला वेग आला आहे.
मंगळवेढा तालुक्यात ५४ हजार हेक्टरवर ज्वारी व अन्य कडधान्यांची पिके आहेत. यामध्ये सर्वाधिक ज्वारीचे पीक आहे. यावर्षी ज्वारीच्या कोठारात ज्वारीचे पीक चांगले आले आहे. पेरणी मागे-पुढे झाली असली तरी ज्वारीचे पीक मात्र दमदार आले आहे. सध्या ज्वारी काढणीचे दिवस असून, दररोज बोराळे नाका येथे अडीच ते तीन हजार मजूर रोजगारसाठी येत आहेत. तसेच अनेक मजूर काळ्या शिवारामध्ये तळ ठोकून आहेत. हे मजूर एकरावर ज्वारी काढणीचे काम घेत आहेत. मात्र, कालच्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. परंतु, गुरुवारी दुपारी ऊन व सावली असे ढगाळ वातावरण तयार झाले होते. मात्र, ज्वारीवर या वातावरणाचा कसलाही परिणाम होत नाही. द्राक्ष, डाळिंबासह इतर पिकांना अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
तालुक्यात सात हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष तर १५ हजार हेक्टरवर डाळिंबाचे पीक आहे. अगोदरच अवकाळी पावसाने ही पिके वाया गेली होती. त्यातच कोरोनानंतर आता कुठेतरी शेतकरी पीक घेऊ लागला असताना यामध्ये अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणाने अधिकच भर घातली आहे. त्यामुळे शेतकरी सतत निसर्गाच्या व मानवनिर्मित वातावरणाच्या संकटात सापडू लागला आहे.
ज्वारी काढणीसाठी लगबग
सध्या नवीन ज्वारीला अडीच ते तीन हजार रूपयांचा दर आहे तर जुन्या ज्वारीला साडेतीन ते चार हजारांचा भाव आहे. करडई, हरभरा, जवस ही पिके काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. वातावरणाचा पिकांना फटका बसू नये, म्हणून शेतकरी जादा मजूर लावून शेतातील कामे करून घेत आहेत.