सोलापूर : सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असल्यामुळे प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. शिवाय लांब पल्ल्यांच्या प्रवासासाठी एसटी गाड्यांची मागणी वाढू लागली आहे. यामुळेच रविवारी सोलापूर विभागातून जवळपास सोळा गाड्या पुणे मार्गावर धावल्या. यातील नऊ शिवशाही गाड्या होत्या.
सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. पण जे कर्मचारी कामावर आहेत, त्या कर्मचाऱ्यांवर एसटी डेपोचे कामकाज सुरू आहे. यामुळे दिवसाकाठी सोलापूर आगारातून जेमतेम २० ते २५ फेऱ्या होऊ लागल्या आहेत. पण अनेक बहुतांश प्रवासी हे पुणे मार्गावर असल्यामुळे या मार्गावर जास्त गाड्या सोडण्यात येत आहेत. रविवारी सोलापूर विभागातून तब्बल सोळा गाड्या सोडण्यात आल्या. यामुळे प्रवाशांची मोठी सोय झाली.
खासगी वाहनचालक हे एसटीपेक्षा जादा दराने तिकीट आकारात असल्यामुळे अनेक प्रवासी एसटीकडे वळत आहेत. यामुळे एसटीला चांगले उत्पन्न मिळत आहे. सोलापूर विभागाचे उत्पन्न आता दिवसाकाठी पाच ते सात लाखांपर्यंत पोहोचले आहे. मागील काही दिवसापासून ते हे सर्वात जास्त उत्पन्न आहे. दरम्यान, एसटी कर्मचारी एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण होईपर्यंत कामावर हजर होणार नाही या भूमिकेवर ठाम आहेत.
सायंकाळी ५ वाजेनंतर वाढतात खासगी वाहनांच्या तिकिटाचे दर
एसटी आगाराकडून सकाळपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यात येत आहेत. यात पुणे मार्गाचाही समावेश आहे. सायंकाळी ५ नंतर सोलापूर आगारातून गाड्या सोडण्यात येत नाहीत. यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. यामुळे खासगी वाहनचालक मात्र दर वाढवत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून होत आहेत.