सोलापूर : लोकसभा निवडणूक निकालाला आता अवघे दोन दिवस उरलेले असताना निरनिराळ्या एक्झिट पोलने दिलेल्या आकडेवारीवरून सोलापुरातून कोण खासदार होणार, याची नागरिकांत चांगलीच चर्चा रंगली आहे.
एक्झिट पोलचे आकडे प्रसिद्ध झाल्यानंतर सोशल मीडिया व नागरिकांत एकच चर्चेचा विषय सुरू झाला आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीत पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला चार जागा मिळतील, असे म्हटले आहे.
या चार जागांमध्ये कोण, अशी चर्चा सुरू झाली आहे. पुण्यातून मोहन जोशींबरोबर सोलापुरातून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे निवडून येतील, असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अॅड. यु. एन. बेरिया व नगरसेवक चेतन नरोटे यांनी मतदारसंघातून घेतलेल्या आढाव्यावरून हा दावा खरा असल्याचे म्हटले आहे. मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूरमधून काँग्रेसला चांगली साथ मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपला सर्वाधिक जागा मिळतील, असे एक्झिट पोलची आकडेवारी सांगत असल्यामुळे सोलापूरची जागा राखण्यात आम्हाला यश मिळणार आहे, असे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
भाजपचे शहर अध्यक्ष अशोक निंबर्गी म्हणाले, आम्ही यापूर्वीच डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य एक लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील, असा दावा केलेला आहे. एका सर्वेक्षणात वंचित आघाडीला एक जागा मिळेल, असे नमूद केले आहे. ही जागा सोलापूरचीच असेल, असे वंचित आघाडीचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी म्हटले आहे. एक्झिट पोल सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत सोलापूरबरोबर इतर चार ठिकाणी उमेदवार विजयी होतील, असा दावा त्यांनी केला.
माढ्यामध्येही रंगतदार चर्चा..
- - एक्झिट पोलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससाठी ९ जागा दाखविल्या आहेत. वाढीव जागांमध्ये माढा, उस्मानाबाद असेल असे म्हटले आहे.
- - माढ्यातून कोण निवडून येणार याबाबत जिल्हा परिषदेत दिवसभर चर्चा सुरू होती. माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे निवडून येतील, असा दावा विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांनी केला आहे तर भाजपचे रणजित नाईक-निंबाळकर यांना माळशिरसमधून मताधिक्य असल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याचे झेडपी सदस्य त्रिभुवन धार्इंजे यांनी म्हटले आहे.