दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सीमेवरील बंधारे टेल टू हेड भरून घेण्याच्या मागणीसाठी नुकतेच वडकबाळ पुलावर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाची जलसंपदा विभागाने दखल घेतली. सध्या अर्जुनसोंड बंधाऱ्यात पाणी साठवले जात असून, चार दिवसांत खालील बंधारे भरून देण्याची तयारी दर्शवली होती. दोन दिवस अधिकाऱ्यांनी त्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले पाणी खाली सोडण्यात त्यांना यश येत नाही हे लक्षात येताच सध्याच्या पाणी सोडण्याच्या पद्धतीतच बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
----
...म्हणृून पाणी सोडण्याचा स्रोत बदलला
आधी मोहोळ शाखा कालव्यातून
जलसंपदा विभागाने यापूर्वी मोहोळ शाखा कालव्यातून सीना नदीत पाणी सोडले होते. अर्जुनसोंड बंधारा भरून पाणी पाकणी, शिंगोली, नंदूर हे बंधारे ओलांडून दक्षिण सोलापूर तालुक्याच्या हद्दीत प्रवेश करणार होते. पाण्याचा प्रवाह अवघा १५० क्युसेकने सुरू होता. आंदोलनानंतर अधिकारी खडबडून जागे झाले, त्यांनी अर्जुनसोंड बंधाऱ्यावर धाव घेतली. हा बंधारा पूर्ण क्षमतेने भरला होता. दरवाजे दीड मीटरपर्यंत उचलून पाणी नदीत सोडण्याचा प्रयत्न करताना परिसरातील शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यामुळे चार दिवसांत पाणी वडकबाळ बंधाऱ्यापर्यंत येणे केवळ अशक्य होते. अर्जुनसोंड प्रमाणेच खालील बंधारे भरल्याशिवाय शेतकरी पाणी सोडून देणार नाहीत याची खात्री झाल्याने त्यांनी पाणी सोडण्याचा स्रोत बदलला.
----------
आता कुरुल शाखेतून दुपटीने सोडला
प्रवाह
लवकर बंधारे भरून घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी कुरुल शाखा कालव्यातून सीना नदीपात्रात पाणी सोडणे सुरू केले. पाण्याचा प्रवाह २७५ क्युसेकने सोडण्यात आला. दुपारपर्यंत पाकणी बंधारा दीड मीटरपर्यंत भरून शिंगोली बंधाऱ्यात पाणी सोडण्यात येणार आहे नदीपात्रातील कोर्सेगावपर्यंतचे सर्वच बंधारे याच पद्धतीने भरून पाणी पुढे प्रवाहित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. वाढत्या पाणी प्रवाहामुळे कोर्सेगाव बंधाऱ्याच्या वरील एकेक बंधारे भरत टेल टू हेड बंधारे भरण्याच्या नियमाचा अवलंब करण्यात येणार आहे.
--------
सीना नदीतील बंधारे ‘टेल टू हेड’ भरून घेण्यासाठी आता आमचा प्रयत्न आहे. सकाळीच दुप्पट वेगाने पाणी कोर्सेगाव बंधाऱ्यापर्यंत कसे पोहोचेल याचे नियोजन केले. त्यासाठी किमान ७ दिवसांचा कालावधी लागेल.
- रघुनाथ गायकवाड, उपअभियंता,
भीमा कालवा उपविभाग, सोलापूर विभाग.
-----