सोलापूर: भारतीय समाजाची जाती आणि धर्मात विभागणी न होता एकसंंघ ‘भारतीयत्व’ ही संकल्पना वृद्धिंगत व्हावी़ जात आणि धर्माच्या पलीकडे जात प्रत्येक भारतीयाला केंद्रीभूत मानून, त्याच्या सर्वंकष उन्नतीचा प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे सांगतानाच मानवता या धर्माचा सन्मान व्हावा, अशी अपेक्षा काशी ज्ञानसिंहासन पीठाचे जगद्गुरू श्री डॉ़चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी व्यक्त केली़ शिवाचार्य हे सोलापुरात एका सामुहिक विवाह सोहळ्यासाठी आले असता ते ‘लोकमत’शी बोलत होते.एरवी गंगा स्रान, बाबा विश्वेश्वर आणि काशी जंगमवाडी मठासारख्या धार्मिक संस्थांसाठी प्रसिध्द असलेली वाराणसी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी तिथे उमेदवारी जाहीर केल्यानंतर हे शहर नव्याने चर्चेला आले़ या शहराने पंतप्रधानांना निवडून दिले असल्याने नव्या सरकारकडून समस्त भारतीयांसह काशीवासीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत़ अशी त्यांनी भूमिका मांडली़ वाराणसी म्हणजेच काशी़ ही देशाची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक राजधानी मानली जाते़ देशातील नव्हे तर जगातील जुन्या शहरांपैकी एक असलेले हे शहर नेहमीच गजबजलेले असते़ यावेळी राजकीय केंद्र म्हणून चर्चेत आले़ मोदींच्या प्रभावाने वाराणसी भारावून गेल्याचा अनुभव निवडणूक प्रचार आणि मतदानाचे वातावरण जवळून पाहिलेल्या महास्वामीजी यांनी सांगितला़ मातृभक्ती आणि देशभक्ती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत़ नरेंद्र मोदी यांनी नेहमीच मातृभूमीप्रति समर्पण भाव व्यक्त केले आहे़ त्यांना मातृभूमीची सेवा करण्याची संधी मिळाली आहे़ सर्वांना बरोबर घेऊन त्यांनी पुढे जावे़ आदिवासी, दुर्लक्षित आणि आर्थिक दुर्बल समूहाच्या कल्याणासाठी, वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे़ तरूणाईच्या कार्यक्षमतेला न्याय देत त्यांच्या मदतीने देशाचा विकास साधावा़ आपला विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी बाहेर न जाता जगातील विद्यार्थ्यांचा आपल्या देशाकडे ओढा वाढण्यासाठी शिक्षण क्षेत्राची नव्याने मांडणी करणे आवश्यक आहे़ त्यांनी आपल्या भाषणातून दिलेली आश्वासने पूर्ण करावीत़सबका साथ, सबका विकास हा शब्द सार्थ करावा़ त्यासाठी काशी विश्वेश्वर आणि जगद्गुरू विश्वाराध्य त्यांना यश देवो़ त्यांच्या विकास योजनांना मित्रपक्षच नव्हे तर विरोधकांनीही राजकीय मतभेद दूर ठेवून पाठिंबा देत देशाच्या हितासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही महास्वामीजी यांनी केले़ वाराणसीत नागरी स्वच्छता, गंगेचे प्रदूषण आदी समस्या आहेत़ त्या दूर व्हाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी शेवटी व्यक्त केली़
------------------------
काशी जंगमवाडी मठ आणि महास्वामीजी वाराणसीत विविध धर्मियांचे चारशेहून अधिक मठ आणि १६०० हून अधिक मंदिरे आहेत़ यात सर्वात जुने मठ म्हणून जंगमवाडी मठ ओळखले जाते़ हे मठ वीरशैव(लिंगायत) संप्रदायातील पाच जगद्गुरूंपैकी विश्वाराध्य भगवत्पाद हे या पीठाचे मूळ पुरूष मानले जातात़ डॉ़चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी या पीठाचे ८६ वे उत्तराधिकारी आहेत़ वीरशैव विचार आणि मूल्ये अधिक समाजाभिमुख करण्यासाठी महास्वामीजी प्रयत्नशील आहेत़ वीरशैव धर्मग्रंथ असलेल्या सिध्दांत शिखामणीस जनतेमध्ये रूजविण्यात त्यांना यश आले आहे़ त्यांच्या प्रयत्नाने या धर्मग्रंथाचे देशातील २६ भाषांसह इंग्लिश , नेपाळी आणि रशियन भाषेतही अनुवाद पूर्ण झाले आहे़