सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील मतदारांनी पाच ग्रामपंचायतींचा गावगाडा राष्ट्रवादी काँग्रेसकडे, ७ ग्रामपंचायती शिवसेनेकडे, भाजपकडे दोन, भाजप-राष्ट्रवादीकडे दोन तर दोन गावात स्थानिक आघाडीच्या हातात दिला आहे. तब्बल १६ ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले.
उत्तर सोलापूर तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या १९४ सदस्य पदांसाठी सोमवारी मतमोजणी झाली. यावेळी अनेक ग्रामपंचायतींमध्ये मतदारांनी सत्तांतर केल्याचे स्पष्ट झाले. नान्नज ग्रामपंचायतीत सत्तांतर करत राष्ट्रवादी-भाजपचे १० सदस्य विजयी झाले. तर शिवसेना-प्रकाश चोरेकर गटाचे ७ सदस्य निवडून आले. बीबीदारफळ ग्रामपंचायतीवरील जनकल्याण महाविकास आघाडीची १० वर्षांची सत्ता उलथवून टाकत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचे ११ सदस्य विजयी झाले. जनकल्याण महाविकास आघाडीचे चार सदस्यही राष्ट्रवादीचेच आहेत. भागाईवाडी, वांगी व होनसळ या ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे.
जुन्या-नव्याची मोट बांधत माजी आमदार दिलीपराव माने यांनी तिर्हे, तेलगाव, गुळवंची, एकरुख, भोगाव, सेवालालनगर व कोंडी या ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सत्ता आणली आहे. तळेहिप्परगा ग्रामपंचायत राष्ट्रवादी-भाजप-रिपाइं पुरस्कृत आघाडीने तर खेड ग्रामपंचायत स्थानिक विकास आघाडीने जिंकल्याचे नूतन सदस्य नागेश कोकरे यांनी सांगितले. राळेरास, साखरेवाडी व हिरज येथील ग्रामस्थांनी एकत्र येत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले होते. तरीही या तीनही गावांमधील प्रत्येकी दोन जागांसाठी मतदान झाले. बहुतेक सदस्य बिनविरोध झाल्याने या ग्रामपंचायती स्थानिक आघाडीच्या समजल्या जातात.
----- या गावांमध्ये सत्तांतर
बीबीदारफळ, भागाईवाडी, नान्नज, होनसळ, वांगी, कळमण, तेलगाव, भोगाव, तळेहिप्परगा, हगलूर, गुळवंची, खेड, कोंडी, बाणेगाव, सेवालालनगर या गावांमध्ये सत्तांतर झाले.
ठळक बाबी
- बीबीदारफळचे माजी सरपंच शिवाजी नन्नवरे हे सलग तिसऱ्या निवडणुकीत दोन जागांवर पराभूत झाले.
- कोंडीत शिवसेनेच्या विक्रांत काकडे गटाचे सहा सदस्य तर विरोधी शिवसेनेचेच नीळ-भोसले-पवार पॅनेलचे ९ सदस्य विजयी झाले.
- तिर्हे येथे भारत जाधव गटाचे पाच सदस्य विजयी झाले.
- भागाईवाडीत सरपंच कविता घोडके विजयी झाल्या, मात्र सत्ता आली नाही.
- बेलाटीत भाजप-सेनेने पुन्हा बाजी मारली.
- तळेहिप्परग्यात रिपाइंचे दिवंगत नेते अंकुश कांबळे यांच्या पत्नी शोभा कांबळे व मुलगा विशाल एकाच प्रभागातून निवडून आले.