मंगळवेढा : तालुक्यात सिध्दापूर, बोराळे, मरवडे, नंदेश्वर, सलगर या प्रमुख तालुक्यातील पाच गावामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तांतर झाले आहे. सिध्दापूरवर पूर्वी स्व.आमदार भारत भालके यांच्या गटाची सत्ता होती. बापूराया चौगुले हे परिचारक गटाचे होते. त्यामुळे पाच वर्षे आ.भारत भालके गटाला सत्ता टिकविता आली. आता पाच उमेदवार आ.भारत भालके गटाचे निवडून आले तर परिचारक-आवताडे गटाचे सहा उमेदवार निवडून आले. त्यामुळे या ठिकाणी सत्तेत बदल झाला आहे.
बोराळेवर जिल्हा परिषद सदस्य नितीन नकाते यांची सत्ता होती. त्यांच्या पत्नी गावच्या सरपंच होत्या. मात्र गणेश गावकरे व इतर आघाडीने या ठिकाणी सत्तेला हादरा दिला असून नकाते यांचे केवळ तीनच सदस्य निवडून आले आहेत. दहा सदस्य हे गणेश गावकरे व इतर आघाडीचे निवडून आले आहेत.
मरवडे गावातही सत्तांतर झाले आहे. या ठिकाणी लतीफभाई तांबोळी यांच्या गटाने बाजी मारत आवताडे आणि भालके गटाला धूळ चारली. भालके गटाला ३,आवताडे गटाला ३ व लतीफभाई तांबोळी यांच्या ग्रामविकास आघाडीला बहुमत मिळाले आहे. नंदेश्वरमध्ये माजी जि.प.सदस्य नामदेव जानकर व भिवा दोलतोडे यांच्या गटाला ६ जागा मिळाल्या आहेत. माजी उपसभापती दादासाहेब गरंडे यांनी बहुमत प्राप्त केले आहे. जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण समिती सभापती दिलीप चव्हाण यांनी सलगरमध्ये सर्व ११ उमेदवार निवडून आणल्यामुळे येथील जाधव गटाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे या पाच गावाचे राजकीय वातावरण भविष्यात सरपंच, उपसरपंच आरक्षणानंतर ढवळून निघणार आहे.