१९६० ते १९७० या दशकात एकाहून एक नायिका आशा पारेख, वहिदा रहेमान, वैजयंती माला, नंदा या गाजत होत्या़ त्यामध्ये साधना हिचे नाव वरच्या क्रमांकावर होते. साधना हिचा जन्म कराची/सिंध (आता पाकिस्तानात आहे) येथे २ सप्टेंबर १९४१ रोजी झाला. तिचे आई-वडील सुशिक्षित होते. वडील हरी-शिवदासानी हे सिंधमधील प्रसिद्ध व्यापारी होते. परंतु, फाळणीनंतर ते दंगलमुळे मोठा व्यापार सोडून भारतात आले. ते मुंबई येथे स्थानिक झाले.
साधनाची आई शिक्षिका होती. साधनाचे शिक्षण मुंबईतील जयहिंद कॉलेज येथे झाले. बालपणी तिने १९५५ साली राजकपूर यांच्या गाजलेल्या ‘श्री ४२०’ या चित्रपटात कोरसमध्ये भाग घेतला होता. किशोर वयात देव आनंद हा तिचा आवडता नायक होता. (आणि योगा-योग पाहून १९६२ च्या ‘हम दोनो’ या चित्रपटात त्याची नायिका झाली होती) तिचा एक फोटो प्रसिद्ध चित्रपट पाक्षिक स्क्रीनमध्ये मुखपृष्ठावर झळकला होता. तो फोटो पाहून प्रसिद्ध ‘लव्ह इन शिमला’ योगा-योग म्हणजे त्यात तिचा नायक असलेला जॉय मुखर्जी याचा पण तो पहिलाच चित्रपट होता. दुसरा योगा-योग म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शक आर. के. नय्यर यांच्याशी तिने १९६६ ला विवाह केला. नंतर साधनाची कारकिर्दीची कमान चढतीच राहिली.
पहिला चित्रपट व त्यातील हिट गाणी झाल्यामुळे साधनाला मोठ्या बॅनरच्या आॅफर येऊ लागल्या. नंतर बिमल रॉय यांच्या ‘परख’ या चित्रपटात तिने नायिकेची भूमिका केली. तिचा खरा चलतीचा काळ १९६१ सालच्या ‘हम दोनो’ या देव आनंदच्या चित्रपटापासून सुरू झाला. ज्या देव आनंदकडे ती किशोर वयात पडद्यावर डोळे न मिटता एक टक लावून पाहत होती. तोच तिचा आता नायक झाला होता. हे तिला खरेच वाटत नव्हते. स्वप्न वाटत होते़ ते सत्यात उतरले होते.
देव आनंदचा त्यात डबल रोल होता. देव आनंदचा डबल रोल व जयदेव यांच्या उत्तम संगीतामुळे तो चित्रपट सुपर डुपर हिट झाला. नंतर तिच्या हिट चित्रपटांची रांगच लागली. १९६२ साली ‘असली-नकली’ /पुन्हा देव आनंद/शंकर जयकिसन, १९६३ -‘मेरे महेबूब’/राजेंद्र कुमार/अशोक कुमार, संगीत-नौशाद हा चित्रपट संपूर्ण रंगीत होता. रंगीत चित्रपटामुळे साधनाचे खानदानी मुस्लिम तरुणीचे सौंदर्य उठून दिसत होते. १९६४ साली ‘वह कौन थी’ यात मनोजकुमार तिचा नायक होता. हा चित्रपट भय कथेवर आधारित होता. याला मदन-मोहन यांचे संगीत लाभले होते. यातील लता मंगेशकर यांची लग जा गले, नयना बरसे ही गाणी अतिशय लोकप्रिय झाली.
नंतर १९६६ साली ‘मेरा साया’ या चित्रपटात तिला डबल रोलची भूमिका मिळाली. यालाही मदन-मोहनचेच संगीत होते तर गाणी लता मंगेशकरांचीच होती. यातील ‘मेरा साया साथ होगा’, नयनों मे बदरा छाये व तिच्या दुहेरी भूमिकेतील अल्लड बंजारन तरुणीचे, आशा भोसलेचे नृत्यगीत. ‘झुमका गीरा रे’ हे गीत अतिशय गाजले. नंतरच्या ‘वक्त’ या बी़ आऱ चोप्रा यांच्या बॅनरच्या मल्टिस्टार ‘वक्त’ या चित्रपटात ती सुनील दत्तची नायिका झाली. यात सुनील दत्त, साधना, शशीकपूर, राजकुमार, शर्मिला टागोर, बलराज सहानी, मदन पुरी अशी कलाकारांची रांगच होती. याला रवी यांचे संगीत होते. हा चित्रपट अर्थातच सुवर्णमहोत्सवी ठरला.
राजकुमार या चित्रपटात ती शम्मीकपूरची नायिका होती. याला शंकर-जयकिसन यांचे सुश्राव्य संगीत होते. त्यामुळे हा चित्रपट पण महोत्सवी ठरला. नंतर १९६६ साली आलेल्या आरजू या चित्रपटात ती राजेंद्र कुमारची नायिका होती. शंकर जयकिसन यांचे उत्तम संगीत, रामानंद सागर यांचे दिग्दर्शन व साधनाचे सौंदर्य व अभिनयामुळे हा चित्रपटही हिट झाला, हे सांगणे नकोच. ‘एक मुसाफीर एक हसीना’ या चित्रपटात ती जॉय मुखर्जींची नायिका झाली होती. या चित्रपटाला ओ.पी. नय्यर यांनी एकापेक्षा एक हिट गाणी दिली होती. साधनाचा शेवटचा यशस्वी चित्रपट ‘एक फूल दो माली’ हा होता.- डॉ. अरविंद बोपलकर(लेखक हे सिनेमाचे अभ्यासक आहेत)