बार्शी : सोयाबीनचे दर हे जागतिक बाजारपेठेवर अवलंबून असून अमेरिकेने चीनची सोयाबीन घेण्याचे कमी केले आहे. त्यामुळे भविष्यात चीन आपल्या देशातील सोयाबीन खरेदीत उतरण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम सोयाबीनचे दर वाढतील, असा तर्क राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल यांनी मांडला.
पाशाभाई पटेल यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला सदिच्छा भेट देऊन व्यापाºयांशी संवाद साधला,यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी आ. राजेंद्र राऊत, नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, बाजार समितीचे अध्यक्ष रणवीर राऊत, संचालक रावसाहेब मनगिरे, मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष दामोदर काळदाते, सचिव भरतेश गांधी, ज्येष्ठ व्यापारी मैनुद्दिन तांबोळी, दिलीप गांधी, सचिन बागमार, प्रवीण गायकवाड, सचिन मडके, तुकाराम माने, जितेंद्र माढेकर, देवकीनंदन खटोड, संतोष बोराडे, नवनाथ गपाट, महेश करळे उपस्थित होते.
पाशाभाई पटेल म्हणाले की, आपल्यापेक्षाही मध्यप्रदेशमध्ये सोयाबीनचे उत्पादन जास्त होत आहे. मागील वर्षी खाद्य तेलावरील आयात शुल्क चारवेळा वाढविले. त्यामुळे सोयाबीनचे दर वाढण्यास मदत झाली. डॉलर आणि रुपयामधील फरक मोठा असल्यामुळे तफावत होत आहे. त्यामुळे निर्यातीला १0 टक्के प्रोत्साहनपर अनुदान देण्याची गरज आहे. आपल्याकडे नॉन जेनेटिक बियाणाची पेरणी केली जाते. आजवर चीन आपले सोयाबीन खरेदी करत नव्हते; मात्र चीनच्या मालाला अमेरिकेने निर्यात ड्युटी वाढवली तर आपल्या देशाची कमी केली आहे. डिसेंबर महिन्यात सोयाबीन खरेदीसाठी चीनचे शिष्टमंडळ आपल्या देशात येणार आहे. आपल्या देशातील उत्पन्नानुसार आपण केवळ ६0 ते ७0 लाख मे. टन सोयाबीन विकू शकतो. त्यामुळे चीन व त्या जोडीला इराणही आपल्या सोयाबीनसाठी मोठे गिºहाईक असणार आहे. त्यामुळे हे सर्व जुळून आले तर आपल्या देशात सोयाबीनचे दर वाढतील, अशी शक्यताही पटेल यांनी व्यक्त केली.
नियम जपून असावेत- बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीची उलाढाल मोठी असून येथील व्यापारीही मोठ्या ताकदीचे आहे. व्यापारी म्हटले की, तेजी-मंदी, शेतमाल खरेदी करणे, साठा करणे हे ओघाने येतेच. काहीवेळा सरकारी नियमामुळे व्यापाºयांना घाबरवले जाते व त्याचा फटका बसून बाजारभाव पडतात. त्यामुळे सरकारचे नियम जपून असावेत, असे पटेल यावेळी म्हणाले.