राजकुमार सारोळे
सोलापूर : शहराचे तापमान कमी करण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाने अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये पहिला हरितपट्टा साकार केला आहे.
तत्कालीन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी शहरात हरितपट्टे निर्माण करण्याची संकल्पना मांडली. त्यानुसार जागेचा शोध घेण्यात आला. एमआयडीसी पोलीस ठाण्याशेजारील सुमारे दोन एकर जागा महापालिकेची पडून होती. या जागेत वेगवेगळ्या प्रकारची ३२०० झाडे लावण्यात आली. त्यामध्ये कडुलिंब, वड, पिंपळ, डोंगरी आवळा, बकुळ, कॅथेडिया, लारजसटोमिया या झाडांचा समावेश आहे. ही झाडे जगविण्यासाठी बोअर घेऊन पंप बसविण्यात आला व निगराणीसाठी कुंपण मारून दोन मजुरांची नियुक्ती करण्यात आली. या झाडांना वेळेत पाणी देण्यात आल्याने येथे हरितवन तयार झाले आहे. आता पाणीटंचाई काळात अक्कलकोट रोड एमआयडीसीतील पाण्याची टाकी धुतल्यानंतरचे घाण पाणी या झाडांसाठी वापरण्यात येत असल्याचे उद्यान विभागप्रमुख निशिकांत कांबळे यांनी सांगितले.
दुसरा हरितपट्टा प्राणी संग्रहालयाच्या परिसरात तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी एक हजार झाडे लावण्यात आली आहेत. या झाडांना देगाव येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील पाणी वापरण्यात येत आहे. जूनमध्ये प्राणी संग्रहालय, मोदी स्मशानभूमी, सात रस्ता चौक, जयभवानी मैदान, सुंदरम्नगर, जुळे सोलापूर पाण्याची टाकी या परिसरात आठ हजार झाडे लावण्यात आली आहेत. यातील पंचाहत्तर टक्के झाडे जगविण्यात यश आले आहे. यावर्षी २ लाख ३० हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट असून, प्रत्येक मिळकतदारास एक झाड लावणे बंधनकारक करण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्याचबरोबर अमृत योजनेतून शहरातील विविध भागात १६ हजार झाडे लावण्यात आली आहेत. जानकीनगर बागेत हरितपट्टा करण्यात आला आहे. त्याचबरोबर नगरोत्थान योजनेतून शहरातील ९ बागांमध्ये हिरवळ फुलविण्याचा प्रयत्न झाला आहे.
झोपडपट्टी हटवून फुलविली बाग- श्तत्कालीन पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्या काळात पोलीस मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ भगवाननगर झोपडपट्टीवासीयांना घरकूल बांधताना झोपड्या टाकण्यात आल्या होत्या. घरकुलाचे वाटप झाल्यावर येथील झोपडपट्टी हटविण्यात आली व तेथे कुंपण मारून आंबा, नारळ, चिकूची झाडे फुलविण्यात आली आहेत. त्यामुळे या परिसराचे सौंदर्य खुलले आहे. त्याचबरोबर ग्रामीण पोलीस मुख्यालय, पोलीस आयुक्तालय, वसंतनगर पोलीस लाईनजवळ बाग फुलविण्यात आल्याने शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. स्मार्ट सिटी योजनेतून हुतात्मा बाग व डिपार्टमेंट गार्डनचे सौंदर्य खुलविण्यात येत आहे.