सोलापूर : इंदिराजी म्हणजे ‘आयर्न लेडी’.. अत्यंत कडक स्वभावाच्या नेत्या; पण ही वस्तुस्थिती नाही. त्या अतिशय मृदु, संवेदनशील अन् प्रेमळ स्वभावाच्या नेत्या होत्या...हे अनुभवलंय जेव्हा संसदेत घाईगडबडीत जाताना माझ्या बोटाला जखम झाली अन् मी बँडेज लावून सभागृहात बसलो. राष्टÑपतींचे अभिभाषण झाल्यानंतर आम्ही सर्वजण जेव्हा सभागृहाबाहेर पडत होतो. तेव्हा इंदिराजींनी माझ्या बोटाचं बँडेज पाहिलं.
अत्यंत आस्थेवाईकपणे चौकशी केली अन् ‘टेक केअर’ म्हणत त्या सभागृहाबाहेर आल्या.. अगदी इंदिराजींच्या घरचं भोजनही आम्ही खासदारांनी घेतलेलं आहे; मग त्या कडक कशा?..ज्येष्ठ नेते अन् माजी खासदार गंगाधरपंत कुचन स्व. इंदिराजींच्या आठवणीत रममाण झाले होते.
१९ नोव्हेंबर हा पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीचा दिवस़ त्यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला काँग्रेसकडून दोनवेळा खासदार राहिलेल्या कुचन यांच्याशी संवाद साधला...दर दोन-तीन महिन्यानंतर इंदिराजी प्रांतनिहाय खासदारांना स्नेहभोजनाचे निमंत्रण देत़ सर्व खासदार आवर्जून हजेरी लावत.
यावेळी त्या प्रत्येक खासदाराकडे आपुलकीने मतदारसंघ आणि त्यांच्या कुटुंबाविषयी विचारपूस करत़ एकदा मी आणि माझी पत्नी स्व़ चंद्रभागाबाई असे दोघेजण त्यांना भेटायला त्यांच्या निवासस्थानी गेलो़ त्यावेळी त्यांनी पत्नीशी पाच मिनिटे संवाद साधला. चंद्रभागाबाईच्या आवडीनिवडीही त्यांनी विचारल्या. मुलगा लक्ष्मीनारायण याच्या लग्नाचे निमंत्रण मी पत्राद्वारे पाठवले़ त्यांनी तत्काळ शुभेच्छा देणारे कार्ड देखील पाठवले़ मी कधीही त्यांच्याकडे तिकीट मिळवण्याकरिता गेलो नाही़ त्यांनी मेरिटच्या आधारे तिकिटे दिली...कुचन सांगत होते.
दहा मिनिटांत घरकूल प्रकल्पाला संमती दर्शवली- सोलापुरातील श्रमिक महिला विडी कामगारांकरिता शासकीय घरकूल प्रकल्प उभारण्याची संकल्पना केली़ त्यानंतर प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करून इंदिराजींना भेटायला दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी गेलो़ निवासस्थानी विविध राज्यांचे मुख्यमंत्री ताटकळत उभे होते़ मी वेळ मागितली. त्यांच्याकडून बोलावणे आले़ मी त्यांच्यासमोर प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली़ त्यांनी शांतपणे ऐकून घेतले़ महिलांचे घरकूल प्रकल्प होत असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आणि तातडीने तत्कालीन मजूर मंत्री वीरेंद्र पाटील यांना फोन करून प्रकल्पाला तडीस नेण्याचे आदेश दिले.
अवघ्या दहा मिनिटात त्यांनी प्रकल्पाला नुसती संमती दिली नाही तर पूर्ण करण्याचे फर्मान देखील सोडले़ त्यांच्या सहकार्यातूनच आशिया खंडातील पहिला श्रमिक महिला विडी कामगार घरकूल प्रकल्प हैदराबाद रस्त्यावर साकारले़ साडेतीन हजार पक्की घरं असलेल्या या प्रकल्पाला मी इंदिरा श्रमिक महिला घरकूल प्रकल्प असे नाव दिले़ अवघ्या दोन ते तीन वर्षांत महिलांच्या हातात चाव्या देखील दिल्या, असे कुचन यांनी सांगितले.