- आप्पासाहेब पाटील
सोलापूर : महापालिकेच्या आवारात हेरिटेज असलेल्या इंद्रभुवन इमारतीला मूळ रूप (पुनर्वैभव) प्राप्त करून देण्यासाठीचे काम वेगात सुरू आहे. सद्य:स्थितीत इमारतीचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, इमारतीच्या सुरक्षिततेसाठी गूळ, मोहरी, मेथी, दही अन् बेलाच्या पानाचा वापर करून लेप तयार करून लावण्यात येणार आहे.
महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी सकाळी इंद्रभुवन इमारतीच्या नूतनीकरण कामाची पाहणी केली. सुरू असलेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आणि आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी नगर अभियंता संदीप कारंजे, कंझर्व्हेशन आर्किटेक्चर मुनीश पंडित यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. ११० वर्षांच्या इंद्रभुवन या हेरिटेज वास्तूला जतन करण्यासाठी स्मार्ट सिटीच्या ५.१३ कोटींच्या निधीतून नूतनीकरण करण्यात येत आहे. साधारणतः गेल्या दहा महिन्यांपासून हे इमारत नूतनीकरणाचे काम नेटक्या पद्धतीने सुरू आहे. सनरक्षण हेरिटेज कन्सल्टंट या कंपनीमार्फत हे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. दीडशे कारागीर यासाठी परिश्रम घेत आहेत. दरम्यान, हे काम अंतिम टप्प्यात आहे.
या महिन्याच्या अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल. महापालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची कार्यालये या इंद्रभुवन इमारतीत पुन्हा स्थलांतरित करण्यात येतील. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने कारागिरांनी या इमारतीला गतसौंदर्य प्राप्त करून दिले आहे.- मुनीश पंडित, आर्किटेक्चर, दिल्ली
महापालिका आयुक्तांनी केली पाहणीमहापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी इंद्रभुवनच्या इमारतीची पाहणी केली. उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या. येत्या महिनाअखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल असे संबंधितांकडून आयुक्तांना सांगण्यात आले. गरज पडली तर ज्यादा कामगार लावा; पण लवकरात लवकर हे काम पूर्ण करा, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या.
आर्किटेक्चर दिल्लीतून आले..भोपाळचे ठेकेदार नाही आलेमहापालिका आयुक्त इंद्रभुवन इमारतीची पाहणी करणार असल्याची माहिती आर्किटेक्चर व ठेकेदारास प्रशासनाच्या वतीने देण्यात आली होती. त्यासाठी आर्किटेक्चर मुनीश पंडित हे दिल्लीतून सोलापुरात दाखल झाले. त्यांनी आयुक्तांना आवश्यक ती माहिती दिली. मात्र, भोपाळचे ठेकेदार आलेच नसल्याचे आयुक्तांच्या निर्दशनास आले.
फर्निचरसाठी टेंडर काढणारया इमारतीत अधिकाऱ्यांची दालने होणार आहेत. २५ लाखांच्या निधीतून फर्निचर व इतर साहित्य खरेदी करावे लागणार आहे. या साहित्य खरेदीसाठी टेंडर प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार असल्याचे माहिती नगर अभियंता संदीप कारंजे यांनी दिली.