कुर्डूवाडी : पुणे-सोलापूर इंद्रायणी एक्स्प्रेस कुर्डूवाडीत तब्बल ३ तास २० मिनिटे उशिरा पोहोचल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. सोलापूर व कुर्डूवाडी शहरातील सर्वांची आवडती गाडी म्हणून ही गाडी ओळखली जाते़ अवघ्या ३ तासांत पुण्याचा प्रवास होत असल्याने व काही जण याच गाडीने पुढे मुंबईला जात असल्याने या गाडीला मागणी जास्त आहे. या गाडीचे आरक्षण करायचे म्हटले तर ८ ते १० दिवस आधीच बुकिंग करावे लागते, नेहमीच ही गाडी फुल्ल चालत असते. आरक्षण नसणार्या प्रवाशांना उभे राहूनच प्रवास करावा लागतो. सध्या सुट्ट्यांमुळे रेल्वेचा सिझन सुरु आहे, सर्व रेल्वे गाड्या फुल्ल आहेत. इंद्रायणी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये पाटस येथे अचानक तांत्रिक बिघाड होऊन बंद पडले. यानंतर पुण्याहून दुसरे इंजिन मागवावे लागले व ही गाडी सोलापूरच्या दिशेने रवाना झाली. ही गाडी कुर्डूवाडी रेल्वे स्थानकावर येण्याची वेळ सव्वाबाराची असताना रेल्वे ३ वाजून ४० मिनिटांनी स्थानकावर आली. इंद्रायणी एक्स्प्रेस ही गाडी पाटस येथे थांबल्याने प्रवाशांना उकाड्याचा नाहक त्रास सहन करावा लागला. खाद्यपदार्थ व पाण्यावाचून प्रवाशांना राहावे लागले. काही खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी याचा फायदा घेत दुप्पट, तिप्पट किमतीने पदार्थांची विक्री केली. चूक नसतानाही प्रवाशांना हा भुर्दंड भोगावा लागला. ही गाडी सोलापूरला दीड वाजता जाते व तेथून लगेचच दोन वाजता पुण्याकडे पुन्हा रवाना होते. मात्र ही गाडी ३ वाजून ४० मिनिटांनी पोहोचल्यावर तेथून पुन्हा कुर्डूवाडीत येण्यासाठी तिला सव्वासहा वाजले. यामुळे या गाडीने पुण्याकडे जाणार्या प्रवाशांनाही सुमारे तीन तास गाडीची वाट पाहावी लागली़
-----------------------------------------
तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांची गैरसोय झाली तर प्रशासनाने त्यांच्या चहा, पाणी व नाश्त्याची सोय करावी़ लहान मुले, महिला व वृध्दांना याचा नाहक त्रास होतो. याबाबत आपण जनरल मॅनेजर मुंबई व डीआरएम सोलापूर यांच्याशी पत्रव्यवहार करणार आहोत. - अमरकुमार माने, मध्य रेल्वे विभागीय रेल्वे सल्लागार समिती, सोलापूर