दक्षिण सोलापूर : क्रिकेट खेळताना मुलांना उकिरड्यात रडणारे जिवंत अर्भक आढळले. या अर्भकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील होनमुर्गी गावात घडली.
सुट्टीचे दिवस असल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील होनमुर्गी गावातील मुले क्रिकेट खेळत होती. क्रिकेट खेळताना चेंडू उकिरड्यात पडला. तो चेंडू आणण्यासाठी गेलेल्या मुलाला लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला़ याचवेळी त्याने जवळ जाऊन पाहिले असता जिवंत अर्भक आढळून आले. उकिरड्यात खड्डा करून या बाळाला त्यात बसवण्यात आले होते़ त्याच्या मानेपासूनचा वरचा भाग उघडा होता. सदाशिव रामपुरे या ग्रामस्थाने अर्भकाला तातडीने मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
मंद्रुप पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आणि किरकोळ उपचारानंतर त्याला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. सध्या सोलापूरच्या शासकीय रूग्णालयतील बालरोग विभागात या अर्भकावर उपचार सुरू आहेत. या अर्भकाच्या जन्मदात्याचा ठावठिकाणा लागू शकला नाही. याबाबत मंद्रुप पोलीस तपासाची चक्रे फिरवली असून, जन्मदात्या आईचा शोध घेत आहेत.