कोरोना रुग्णास व्हेंटिलेटरची गरज लागल्यास तातडीने बार्शी, अकलूज, सोलापूर, अहमदनगर, पुणे किंवा बारामती या ठिकाणी पाठवावे लागत आहे.
विशेष म्हणजे गेल्या चार दिवसांपासून करमाळ्यात कोठेही रेमडेसिविरचे एकही इंजेक्शन मिळत नाही. त्यामुळे करमाळ्यातील आरोग्य यंत्रणेची गंभीर परिस्थिती समोर आली आहे. करमाळ्यातील आरोग्य यंत्रणेसमोर अनेक आव्हाने उभी आहेत.
करमाळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशाला व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय मुलींच्या वसतिगृहात कोविड केअर सेंटर सुरू आहे. येथे रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, येथील रुग्ण गंभीर होऊ लागल्यास पुढील उपचारासाठी शासकीय किंवा खासगी हॉस्पिटलमध्ये हलवावे लागत आहे. कोरोनावरील उपचार गोरगरीब कुटुंबातील व्यक्तीला परवडत नाही. लाखोंच्या घरात होणारा खर्च परवडणारा नसल्याने सर्वसामान्य नागरिक हतबल झाले आहेत.
करमाळा तालुक्यात व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था नसल्याने कोरोना रुग्णांना व्हेंटिलेटर लावण्याची गरज निर्माण झाल्यास सोलापूर, बार्शी, अकलूज, सोलापूर, बारामती, पुणे, अहमदनगर येथे हलवावे लागत आहे. मात्र, या ठिकाणीसुद्धा अचानक व्हेंटिलेटर बेड मिळत नाही. त्यामुळे करमाळ्यात व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.
आतापर्यंत कोरोनामुळे करमाळा शहरात १७ व ग्रामीण भागात ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यूदर १.७२ टक्के आहे. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी करमाळ्यात व्हेंटिलेटर व रेमडेसिविरची उपलब्धता होणे गरजेचे आहे.
----करमाळा उपजिल्हा रुग्णालयात १० ऑक्सिजन बेडची व्यवस्था आहे. सध्या येथे सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रेमडेसिविर इंजेक्शन सध्या उपलब्ध नसल्याने सरकारी व खासगी रुग्णालयात रुग्णांवर उपचार करताना अडचणी येत आहेत. लवकरच उपलब्ध होतील.
-डॉ. अमोल डुकरे, अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, करमाळा.
----
करमाळ्यात कुठेही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे व्हेंटिलेटरची गरज निर्माण झाल्यास रुग्णांना पुढील उपचारासाठी बाहेर पाठवावे लागत आहे. रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना इंजेक्शनसाठी धावपळ करावी लागत आहे.
- भरत आवताडे, उपजिल्हा प्रमुख शिवसेना, करमाळा