पानगाव : मागील दहा दिवसांपासून पानगावात जनावरांतील लाळ्या खरकुत रोगाचा प्रादुर्भाव वेगाने वाढला आहे. यापैकी तीन जनावरांचा मृत्यू झाला असून २०० जनावरांना या रोगाचा संसर्ग झाला आहे.
पानगाव पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एकमध्ये असून यामध्ये पानगावसह सौंदरे, साकत, कळंबवाडी (पा.), बावी (आ.), रस्तापूर, उंडेगाव, काळेगाव या गावांचा समावेश होतो. पानगावमध्ये सध्या २१०० गायी, म्हैस, बैल जनावरे आहेत. यापैकी खाजगीत ६०० जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. उर्वरित पशुपालकांनी त्वरित लसीकरण करून घेण्याचे अवाहन पशुधन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, या लसीचा प्रभाव सहा महिने आहे. जानेवारीतील लसीकरणानंतर जूनमध्ये लस उपलब्ध होणे गरजेचे होते. मात्र, सप्टेंबर अखेरीस अचानक आलेल्या या साथीच्या रोगाला पशुपालकांना स्वखर्चाने सामोरे जावे लागले आहे. साथीच्या रोगासाठी डिसेंबरमध्ये उपलब्ध होणारी लस लवकरच उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जाते. या संसर्गजन्य आजारात जनावरांच्या पायाच्या नखाला जखमा होतात. व तोंडात जखमा होऊन लाळ येते. प्रचंड ताप येण्याने आहारावर ही परिणाम होतो.
---
पशुधन विभागाने आढावा घेऊन त्वरित लाळ्या खरकुत रोगाची लस उपलब्ध करावी. पशुधन जोपासण्याचा प्रयत्न करावा.
- शरद कापसे
पशुपालक
---
सध्या खाजगी लसीवर पशुपालकांनी लक्ष केंद्रित करावे. आपले पशुधन वाचवावे. लवकरच या रोगावर सरकारी लस उपलब्ध होईल.
- प्रमोद मांजरे
पशुधन अधिकारी, पानगाव