वडवळ : मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेल्या ग्रामीण पेयजल योनजेला वडवळमध्ये आधीच या कामाला उशीर झाला, त्यात ठेकेदाराने काम निकृष्ट केले. अशा स्थितीत ही योजना का स्वीकारावी, अन् जनतेला शुद्ध पाणी केव्हा मिळणार, असा सवाल करीत वडवळ ग्रामपंचायतीने ठराव करून या कामाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांकडे केली आहे.
गेल्या सहा वर्षांपासून या योजनेचे काम गावात सुरू असून, हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, यातील पाईपलाईनचे कामदेखील निकृष्ट दर्जाचे झाले आहे. अद्याप यामधून ग्रामस्थांना पाणी पुरवठा झालेला नाही. याकामी ठेकेदाराचे काम समाधानकारक नाही. ही योजना ग्रामपंचायतीच्या सहमतीशिवाय हस्तांतरण करून घेऊ नये. याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी, असा ठरावदेखील वडवळ ग्रामपंचायतीने केला आहे. याबाबत सरपंच जालिंदर बनसोडे, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत शिवपूजे व राहुल मोरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की ‘एकतर या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आधीच उशीर झाला. त्यात हे काम निकृष्ट झाले आहे. त्यामुळे या कामाच्या चौकशीची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.
----
संबंधित ठेकेदारास वारंवार तोंडी, लेखी पत्र देऊन पाठपुरावा केला. मात्र, कामात सुधारणा झाली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत रितसर ठराव करून पुढील कार्यवाहीस प्रारंभ केला आहे.
- तात्या नाईकनवरे, ग्रामसेवक, वडवळ
----
...अन्यथा तहसीलसमोर बेमुदत उपोषण
ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले आहे. त्याच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नोंदवून चौकशी व्हावी. त्याच्याकडील रक्कम वसूल करण्यात यावी. अन्यथा मोहोळ तहसीलसमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहुल मोरे यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे.