लोकमत न्यूज नेटवर्क
बार्शी : तालुका कोरोनाने त्रस्त असताना दुसऱ्या लाटेत नव्याने म्युकरमायकोसिस रुग्ण आढळून येत आहेत. बार्शी तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. वेळेवर उपचार मिळवण्यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे.
तालुक्यातील आगळगाव, पिंपरी पा. आणि वैराग येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यात आगळगाव येथील एक रुग्ण १५ एप्रिलला कोरोनाबाधित आला. बार्शीच्या कॅन्सर हॉस्पिटल आणि सोमानी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. दरम्यान, २४ एप्रिलला त्यांना म्युकरमायकोसिस झाल्याचे समजताच सोलापूरचे एका हॉस्पिटलमध्ये दाखल करून २६ एप्रिलला त्यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन करण्यात आले. मात्र, त्यांचा अवयव निकामी झाला तसेच वैराग येथील एक रुग्ण कोरोनाबाधित आला. तो बरा झाला होता परंतु त्यास म्युकरमायकोसिस याची लक्षणे आढळून आले. त्याच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करूनही त्याचा एक डोळा निकामी झाला.
---
कोरोनावर मात करूनही म्युकरमायकोसिसचा बळी
पिंपरी (आ). येथील एका रुग्णाने कोरोनवर मात केली होती. पण त्यास या नव्याने शिरकाव झालेल्या म्युकरमायकोसिस लागण झाल्याने सोलापूर येथे नेऊन नाकावर शस्त्रक्रिया करावी लागली. हा आजार बुरशीजन्य असला तरी त्याचा वेळेवर उपचार घेतल्यास बरा होतो. त्यासाठी लक्षणे दिसताच वेळेवर उपचार करून घेणे गरजेचे आहे शिवाय कोरोनामधून जरी बरे झाले असले तरी आणखीन काही दिवस रुग्णांना काळजी घ्यावी लागणार आहे.