सोलापूर : लॉकडाऊन काळात केशकर्तनालय व्यावसायिकांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खर्चात वाढ झाल्याने दरही वाढले होते. दाढीसाठी १०० रुपये आणि कटिंगसाठी १५० रुपये ग्राहकांना मोजावे लागत होते. लॉकडाऊन काळात दाढी- कटिंगसाठी दर ३०० रुपये होते. ते आता ५० टक्के कमी झाले असून, ते १५० रुपयांपर्यंत आलेले आहेत.
सध्या सर्व सुरळीत होत असतानाही दाढी आणि कटिंगचा दर अधिक असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी नियम व अटींचे पालन करताना या व्यवसायातील खर्चही वाढला आहे. दर ५० टक्क्यांपेक्षा कमी केला असला तरी दुकानात थर्मल स्क्रीनिंग, मास्क, हॅण्डग्लोव्हज, नोंदणीसाठी रजिस्टर, ॲप्रन, सॅनिटायझर, प्रत्येकाला वेगळा कटिंग शेड, याचा खर्च अद्यापही हा खर्च व्यावसायिकांना करावा लागत आहे.
- साधी कटिंग १५० - १००
- स्टायलिश कटिंग ८० - १००
- लहान मुलांची कटिंग १०० - ७०
- दाढी १०० - ७०
- केस काळे करणे ४०० - २५०
- फेशिअल ४०० - २५०
------------
दाढी आता घरातच
दाढीचे दर अधिक वाटत असल्याने बहुतेक ग्राहक आता दाढी घरीच करीत आहेत. यापूर्वी सलून व्यवसायात अधिक प्रमाणावरील ग्राहक दाढी करणारे असायचे. कोरोनानंतरच्या काळात त्यात घट झाली. कोरोनाकाळात सलूनमध्ये दाढी करण्यावर प्रतिबंध होता. ग्राहकांनी आता तीच सवय पडलेली दिसत आहे.
---
महागाई वाढली
वाढत्या महागाईचा फटका सलून व्यवसायाला मोठा बसला आहे. वर्षभर व्यवसाय बंद असताना अनेकांवर दुकान भाडे थकले. आर्थिक आपत्ती ओढावली. सरकारकडून कसलीही मदत मिळाली नाही. नंतरच्या काळात अनेक दुकानांची भाडेवाढ झाली. फेशिअल, ब्लेड, क्रीम यासारख्या साहित्याच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली. वीज बिल वाढले, त्यामुळे दर कायमच ठेवावे लागले, असे या व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
---
व्यवसाय अजूनही तोट्यातच
लॉकडाऊन काळात मोठा फटका सहन करावा लागला. अद्याप व्यवसाय परिपूर्ण रुळांवर आला नाही. सध्या महागाई, दुकानाचे भाडे, कमी दर आणि नवीन आलेल्या ओमायक्रॉन स्ट्रेनमुळे व्यवसाय मंदावला असून, तो ५० ते ४० टक्क्यांवर आला आहे.
-दत्ता वाघमारे, सलून व्यावसायिक