कुर्डूवाडी : शहरातील सराफाच्या डोळ्यात चटणी टाकून व पिस्तूलचा धाक दाखवून लुटणाऱ्यांची गोपनीय माहिती देणाऱ्याला बक्षीस देण्याची घोषणा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांनी केली आहे.
येथील सराफ व्यापाऱ्याचा मुलगा शुभंकर सुरेंद्र पाठक (वय २६, रा, जैन मंदिर, कुर्डूवाडी) हे दुकान बंद करून गुरुवारी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास कामगार तानाजी सलगर याच्याबरोबर मोटरसायकल (एमएच- ४५, यु-७४८९) वरून घराकडे निघाले होते. सोबत दागिन्यांच्या बॅगा घेऊन निघाले होते. घराजवळ पोहचताच त्यांंच्या पाठीमागून मोटरसायकलवरून आलेल्या तिघापैंंकी एकाने कामगार तानाजी सलगर यांच्या डोळ्यात चटणी टाकली. त्यानंतर शुभंकर पाठक याच्यावर पिस्तुल रोखून धमकावत दागिन्यांच्या बॅगा हिसकावण्याचा प्रयत्न केला.
मात्र तो प्रयत्न अयशस्वी झाल्याने चोरटे लगेच येथील विठ्ठल मंदिराच्या दिशेने पळून गेले. शहरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र त्यातील आरोपींंचा शोध अद्यापही येथील पोलिसांना लागला नाही. उलट तपास संथगतीने सुरू असल्याच्या तक्रारी आल्या.
.---
धागेदोरे हाती लागेनात
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, श्वान पथकालाही पाचारण केले. परंतु त्याचाही काही उपयोग झाला नाही. काही व्यापाऱ्यांनी दुकानात सीसीटीव्ही लावले आहेत. परंतु रस्त्यावर चित्रीकरण होईल अशा स्थितीत लावले नसल्याने तपासात अडचणी निर्माण झाल्या. या घटनेतील चोरट्यांची माहिती गोपनीय द्यावी, त्याचे नाव गोपनीय ठेवू, त्याला बक्षीस देऊ असे यावेळी डॉ.हिरे यांनी जाहीर केले आहे.
...........