आप्पासाहेब पाटील
सोलापूर : स्त्री केवळ घराण्याची गृहलक्ष्मीच नव्हे तर पुरुषाची भाग्यलक्ष्मीही असते, याचा प्रत्यय दिला आहे कुंभारीच्या ज्योत्स्नानं. ज्या घरात आयुष्यभर दारुचा घमघमाट सुटायचा, तिथे आता तिच्या पुढाकारातून कपड्यांचा झगमगाट दिसू लागला आहे.
वर्षानुवर्षे सुरू असलेला गावठी दारुविक्रीचा व्यवसाय बंद करून सन्मानपूर्वक कपड्यांचा व्यवसाय या रणरागिणीने सुरू केला आहे. दिल्ली, मुंबई, हैदराबादसारख्या मेट्रो सिटीत मिळणारे फॅशनेबल कपडे आता छोट्याशा कुंभारीतही मिळू लागले आहेत. तिमिरातून तेजाकडे निघालेल्या वाटचालीची ही कहाणी आहे कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील ज्योत्स्ना विजय मंजूळकर या महिलेची. वर्षानुवर्षे दारू विक्री करणारं हे कुटुंब ज्योत्सनाच्या जिद्दीपुढं नमलं अन् नव्या व्यवसायात रमलं, असेच म्हणावं लागेल.
सोलापूरसारख्या स्मार्ट शहरात ज्योत्स्ना राहायची. घरची परिस्थिती तशी साधारणच, पण आईवडिलांच्या कष्टाने त्याकाळचे दिवस मात्र आनंदीच होते. भविष्यात लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यायची अन् पोलीस कमिशनर व्हायचं हेच स्वप्न ज्योत्स्नानं उराशी बाळगलं होतं. मात्र, शिक्षण घेत असताना एका मुलासोबत प्रेम जुळलं अन् आयुष्यच सारं बदलून गेलं.
प्रेमाचं रुपांतर लग्नात झालं. २००० साली ज्योत्स्ना अन् विजय यांचा विवाह झाला. मुलगा पाचवीत शिकत असून मुलगी पहिलीच्या वर्गात. लग्न करून घरी आल्यापासून घरात दारुचा घमघमाट. घरभर पडलेल्या दारू बाटल्या अन् ग्लास. लोकांची भांडणं. शिवीगाळ अन् बरचं काही तिच्यासमोरच घडू लागल्या. याचा विपरित परिणाम मुलांवर होऊ लागला होता. हे पाहून तिनं खूपवेळा हा व्यवसाय बंद करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यश आलं नाही.
पती विजयचीही समजूत काढली. मात्र, त्यातही यश आले नाही. शेवटी सोलापूरच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या संकल्पनेतील 'ऑपरेशन परिवर्तन' मोहिमेमुळे दारुविक्रेता विजय अन् त्याची पत्नी ज्योत्स्नाचं वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले व अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी समुपदेशन केले. नवा व्यवसाय करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिला. बचत गटाच्या माध्यमातून कपड्यांचा व्यवसाय उभा करण्यासाठी भांडवल उभा करून दिलं अन् वर्षानुवर्षे सुरू असलेले दारुचे दुकान बंद झालं.
तब्बल २२ वर्षांनंतर कपड्याचे दुकान सुरू केलं. दिल्ली, मुंबई अन् हैदराबादमधील फॅशनेबल कपडे विकत आणून स्वत:चा कपडे, साड्या, ड्रेस मटेरियल अशा एक ना अनेक प्रकारच्या कपड्यांचा असा व्यवसाय सध्या जोमानं सुरू आहे. मदतीला तिचे पती विजय हेही प्रामाणिकपणे हातभार लावत आहे. शिवाय सासरेही मोलाची मदत करीत आहेत.
'माझं स्वप्नं जरी मला पूर्ण करता आले नसले तरी माझ्या मुलानं माझं ते स्वप्न पूर्ण करावे, अशी माझी इच्छा आहे. म्हणून त्याच्या शिक्षणाला चांगले महत्त्व देत आहे. त्याला गुरुकुलमध्ये घातलं आहे. तो शिक्षण घेईल अन् माझं स्वप्न पूर्ण करेल, अशी आशा तिनं ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.