सोलापूर : ‘लोकमत’चे संस्थापक स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. जवाहरलालबाबूजी दर्डा यांची जयंती आणि ‘लोकमत’ सोलापूरच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरास प्रारंभ झाला़ शहर व जिल्ह्यातील १६ ठिकाणी या शिबीर सुरू आहे़ या शिबीरात जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले, जि़प़ मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ राजेंद्र भारूड यांच्यासह अन्य अधिकारी व मान्यवरांनी रक्तदानात सहभाग नोंदविला़. या महारक्तदान शिबिरात शहर आणि जिल्हावासीयांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आले आहे.
या महारक्तदान शिबिराचे उद्घाटन पार्क मैदानावरील मुळे पॅव्हेलियन येथे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते झाले़ यावेळी पोलीस आयुक्त महादेव तांबडे, महापौर शोभा बनशेट्टी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, सोलापूर लोकमतचे संपादक राजा माने, सहा़ सरव्यवस्थापक रमेश तावडे आदी मान्यवर उपस्थित होते़ . कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोलापूर लोकमतचे संपादक राजा माने यांनी केले तर आभार सहा़ सरव्यवस्थापक रमेश तावडे यांनी मानले़
स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालबाबूजी दर्डा यांनी ‘लोकमत’ची स्थापना करून महाराष्टÑातील सामान्यजनांसह सर्वच क्षेत्रातील वाचकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मांडत ‘लोकमत’ने वृत्तपत्रसृष्टीत प्रथम क्रमांकाचे स्थान पटकाविले. ‘लोकमत’ची आवृत्ती सोलापुरात पंचवीस वर्षांपूर्वी सुरू झाली. सोलापूरकरांच्या अन्यायाला वाचा फोडत ‘लोकमत’ने आक्रमक पत्रकारितेच्या जोरावर जनतेच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक केली. रौप्यमहोत्सवी वाटचाल करणाºया ‘लोकमत’ने आपल्या वाटचालीत सामाजिक जबाबदाºयाही उचलल्या. लातूर भूकंपग्रस्तांना मदत, कारगील शहिदांच्या मुलांसाठी वसतिगृह उभारले. सोलापूर जिल्ह्यातील वाचनालयांना ग्रंथ उपलब्ध करून दिले. शिवाय अनेक वेळा रक्तदान शिबिरांचे आयोजन केले.
‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलालबाबूजी दर्डा यांच्या जयंतीचे औचित्य आणि ‘लोकमत’ सोलापूरच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या महारक्तदान शिबिराचे समन्वयक म्हणून बार्शीच्या श्रीमान रामभाई शहा रक्तपेढीचे उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ हे काम पाहत आहेत.
या महारक्तदान शिबिरात बार्शी येथील इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या श्रीमान रामभाई शहा रक्तपेढीसह सोलापूरची हेडगेवार रक्तपेढी, अश्विनी रक्तपेढी, अक्षय रक्तपेढी, पंढरपूर रक्तपेढी, मल्लिकार्जुन रक्तपेढी, सिव्हिल रक्तपेढी, बजाज रक्तपेढी, पंढरपूर आणि गोपाबाई दमाणी रक्तपेढी रक्तसंकलन करणार आहे. या महारक्तदान शिबिरात जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा संघटना, महिला बचत गट, महिला मंडळांनी तसेच सर्वच क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ‘लोकमत’च्या सोलापूर आवृत्तीचे संपादक राजा माने आणि सहायक सरव्यवस्थापक रमेश तावडे यांनी केले आहे.
शहर व जिल्ह्यात या ठिकाणी आहे रक्तदान शिबीर सुरू
- - सोलापूर लोकमत भवन, होटगी रोड आणि मुळे पॅव्हेलियन हॉल, पार्क मैदान
- - वैराग : सौ. सुवर्णलता गांधी महाविद्यालय
- - बार्शी : संत तुकाराम सभागृह, शिवाजी महाविद्यालय
- - करमाळा : दत्त मंदिर,विकासनगर
- - अक्कलकोट : मल्लिकार्जुन देवस्थान ट्रस्ट मंगल कार्यालय
- - मोहोळ : कै. शहाजीराव पाटील सभागृह,संभाजी चौक
- - मोडनिंब ग्रामपंचायत कार्यालय
- - माळशिरस ग्रामीण रूग्णालय
- - कुर्डूवाडी : ग्रामीण रूग्णालय
- - टेंभुर्णी : रोटरी क्लब हॉल, रेस्ट हाऊसजवळ
- - माढा : ग्रामीण रूग्णालय
- - पंढरपूर : टिळक स्मारक ट्रस्ट
- - मंगळवेढा : श्रीराम मंगल कार्यालय, शिशुविहारशेजारी
- - सांगोला : समर्थ मंगल कार्यालय, वासूद रोड
- - अकलूज : उपजिल्हा रूग्णालय
रक्तदात्यांनी स्वत:चा पासपोर्ट साईज फोटो आणावा- लोकमत’च्या महारक्तदान शिबिरात सहभागी होणाºया रक्तदात्यांचा ‘लोकमत’च्या वतीने यथोचित गौरव करण्यात येणार आहे. रक्तदात्यांना रक्तपेढीकडून प्रमाणपत्र दिले जाणार आहे. शिवाय ‘लोकमत’ही या महान कार्यात सहभागी झालेल्या रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.या महारक्तदान शिबिरास येताना रक्तदात्यांनी स्वत:चे पासपोर्ट साईज छायाचित्र आणावे, असे आवाहन ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आले आहे. महारक्तदान शिबिरात सहभागी होणाºया शासकीय कर्मचाºयांना सरकार रक्तदानाच्या दिवशी किंवा अन्य दिवशी बदली सुटी देऊन प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाºयांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.