आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा महापूजेसाठी १९ जुलै रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास टेंभुर्णीमार्गे पंढरपूरला जात होता. ताफा आजोती पाटीच्या आसपास आला असताना समोरून भरधाव वेगाने आलेले अर्जुन दुर्योधन भोंगळे (वय ४२), किरण दत्तात्रय हेलाडे (वय ३०, रा. भैरवाडी, ता. नेवासा, जि. अहमदनगर) हे मोटारसायकलवरून पडून जखमी झाले.
ही बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी त्वरित त्यांच्या ताफ्यातील गाडीतून जखमींना रुग्णालयात पाठविण्याच्या सूचना दिल्या. शिवाय त्यांच्या तब्यतेची विचारपूस केली. ताफ्यातील गाडीतून जखमींना पंढरपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शिवाय संतोष दुर्योधन भोंगळे (भाऊ), कैलास वाखुरे (मित्र) यांना त्यांच्या फोनवर घटनेची माहिती देण्याचे काम पोलिसांनी केले. जखमींची प्रकृती स्थिर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखविलेल्या संवेदनशील भूमिकेमुळे सर्वसामान्य नागरिकांतून कौतुक होत आहे.