सोलापूर : डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर हे महाविद्यालयातील अध्यापकांना बेकायदेशीर आदेश देत अन्याय करत आहेत, असा आरोप एमएसएमटीए (महाराष्ट्र स्टेट मेडीकल टिचर्स असोसिएशन) संघटनेने केला आहे. या बाबीची दखल घेण्यासाठी संघटनेतर्फे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्त व संचालकांना पाठविले आहे.
डीन डॉ. संजीव ठाकूर हे त्यांच्या मर्जीत नसलेल्या अध्यापकांना वारंवार मेमो देणे, निलंबित करण्याची धमकी देणे, सक्तीच्या रजेवर पाठवणे आदी बेकायदेशीर कामे करत आहेत. काही अध्यापकांना मूळ पदाचे नसलेले कमी प्रतीचे काम करण्यास भाग पाडत असून दुर्लक्ष केले असा आरोप करून वेतन कपात करत आहेत.
डीन डॉ. ठाकूर हे अप्रशासकीय व बेकायदेशीर आदेश देत असल्यामुळे सर्व अध्यापक हे दडपणाखाली काम करत असून भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. या सर्व प्रकारांमुळे संस्था व शासनाची प्रतिमा मलिन होऊन बदनामी होत आहे. याचा विचार करून संघटनेने अन्याय दूर करण्याची विनंती केली असून न्याय न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
अस्थिव्यंगोपचार विभागाचा कार्यभार शल्यचिकित्सकांकडे
डॉ. ठाकूर यांनी कोणतीही चौकशी न करता अस्थिव्यंगोपचार विभागाच्या विभाग प्रमुखपदाचा कार्यभार अनिश्चित कालावधीसाठी काढून घेतला आहे. तसेच त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून अस्थिव्यंगोपचार विभागाचा कार्यभार शल्यचिकित्सकांकडे देण्यात आला आहे. यामुळे गरीब रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे पत्रात नमूद केले आहे.
रुग्णसेवा योग्य रितीने व्हावी हाच माझा उद्देश असतो. यासाठी डीन म्हणून माझ्याकडे अधिकार आहेत. जर एखादा डॉक्टर रुग्णाकडे व्यवस्थित लक्ष देत नसल्यास त्याविरोधात मला कारवाई करावी लागणारच. काही डॉक्टर हे उद्धटपणे बोलणे, काम व्यवस्थित न करणे आदी चुका करत होते. एखादा योग्य माणूस विभाग प्रमुखाचा कार्यभार सांभाळू शकत असेल तर त्याला ते देता येऊ शकते. या सर्वांबाबत शासनाने विचारणा केल्यास मी त्यांना य़ोग्य उत्तर देईन.
- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, डॉ. व्ही. एम. मेडिकल कॉलेज.