सोलापूर : मराठा आरक्षणासंदर्भात सोलापूरात शुक्रवारी (4 मे) मागासवर्गीय आयोगासमोर जनसुनावणी प्रारंभ झाला. यावेळी समितीपुढे निवेदन देण्यासाठी आलेल्या अखिल भारतीय माळी महासंघाचे पदाधिकारी शंकरराव लिंगे तसेच अॅड. राजेंद्र दीक्षित यांच्या तोंडाला काळे फासून कपडे पाडण्यात आले. शंकरराव लिंगे महासंघाच्या लेटरपॅडवर निवेदन घेऊन समितीला भेटण्यासाठी आले होते. मात्र संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला. प्रकरण हातघाईवर आल्यावर त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले. शंकरराव लिंगे त्यांचे कपडेही संतप्त कार्यकर्त्यांनी फाडले. पोलिसांनी मध्यस्थी करून त्यांना वाहनातून पोलीस स्टेशनला रवाना केले.
या जनसुनावणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने गेल्या 15 दिवसांपासून तयारी करण्यात आली होती. या संदर्भात जनजागरण करण्यासाठी विविध पातळीवर बैठकांही झाल्या. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी हजारोंच्या संख्येने निवेदन तयार करण्याचे आवाहन करण्यात आले.
त्यानुसार शुक्रवार सकाळपासूनच शासकीय विश्रामगृहात मराठा समाजातील विविध संघटना, सर्वसामान्य नागरिक, लोकप्रतिनिधी हे मागासवर्गीय आयोगाला भेटण्यासाठी आले. याचवेळी ओबीसी चळवळीतील शंकर लिंगे व अॅड. राजन दीक्षित हे आयोगाला सामोरे जाण्यासाठी आले असता मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शंकर लिंगे व अॅड. राजन दीक्षित यांना सुरूवातील काळे फासले. त्यानंतर याच्यात वादावादी सुरू झाली. धक्काबुक्कीमध्ये लिंगे यांचे कपडे फाडले. दीक्षित यांनाही मारहाण झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर या दोघांना कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर काढले.