सोलापूर : चांगलं आरोग्य राखण्याकरिता घरातच भाजीपाल्याची नैसर्गिक शेती पिकवता येईल. याबाबत प्रचार आणि प्रबोधन करण्याच्या उद्देशाने प्रेरित होऊन सोलापुरातील मातीविरहित बाग संस्थेने सोलापुरातील तब्बल सात हजार लोकांना भाजीपाल्याची विविध रोपे वाटली आहेत. विशेष म्हणजे या रोपांसोबत सेंद्रिय खत देखील मोफत दिले.
घरातील कुंडी, बकेट तसेच इतर मोकळ्या जागेत भाजीपाल्यांची नैसर्गिक शेती करता येते याबाबत मोफत मार्गदर्शनही करण्यात आले. सोलापुरातील अनेकांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले आहे. अवघ्या दोन दिवसात तब्बल सात हजार रोपे वाटण्यात आली. असा अभिनव उपक्रम सोलापुरात पहिल्यांदा झाल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली. २८ जुलै या जागतिक निसर्ग संवर्धन दिनाच्या पार्श्वभूमीवर हा अभिनव उपक्रम घेण्यात आला, अशी माहिती मातीविरहित बाग संस्थेचे प्रमुख प्रकाश भुतडा यांनी ‘लोकमत’ला दिली.
काळी वांगी, पांढरी वांगी, मिरची, सिमला मिरची, टोमॅटो या सहा प्रकारच्या भाजीपाल्याची रोपे वाटण्यात आली. त्याकरिता संस्थेचे संतोष देशमुख, निखिल शहा, सुरेश नकाते, अरुणा गुजर, ममता बोलाबत्तीन, शारदा बनगर, डॉ. मनोज गायकवाड, त्रिभुवनदास जक्कल, अशोक खोबरे यांनी परिश्रम घेतले.
शांती गुलाब गोशाळेचे प्रमुख परिमल भंडारी यांनी रोपांसोबत मोफत खत देखील दिले आहे. सोलापुरात कन्ना चौक, नवीपेठ, माणिक चौक, विजापूर रोड, लष्कर, शेळगी या सहा ठिकाणी या रोपांचे वाटप झाले. प्रकाश भुतडा यांच्या पुढाकारातून हा अभिनव उपक्रम सोलापुरात झाला.