मोहोळ : कोरोनामुळे सध्या शाळा बंद आहेत़ नाही तरी उन्हाळी सुट्ट्या लागल्याच असत्या, मात्र या सुट्टीतही शेटफळ (ता़ मोहोळ) झेडपी शाळेतील चिमुकल्यांनी कोरोना जाणीवजागृती अत्यावश्यक असल्याने मास्क बांधून घरातूनच पोस्टर झळकावत चौदाखडीतून कोरोना जागृतीचा संदेश देत आहेत.
अनेकांनी आपल्या कविता, गाणी, भारुड, लावणी अशा पारंपरिक लोकसंगीताद्वारे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून जाणीवजागृती केली. हाच धागा पकडून अ- अननसाचा... आ आ - आगगाडीचा... असा संबोध देणारी मुळाक्षरे आज ‘अ’ म्हणजे अफवांवर विश्वास ठेवू नका. ‘आ’ म्हणजे आरोग्य कर्मचाºयांना सहकार्य करा. असा संदेश देताना दिसत आहेत. शाळेतील उपक्रमशील शिक्षक रवींद्र देबडवार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला गेला. मुळाक्षरातील प्रत्येक अक्षर वापरून त्यापासून कोरोनाचा बचाव कसा करावा? त्याची लक्षणे काय? त्याची कारणे कोणती? त्यावरील उपाय कोणते? अशा विविध प्रश्नांसंबंधीचा संदेश या चौदाखडीच्या मुळाक्षरांमधून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या उपक्रमात ज्ञानेश देबडवार, सिद्धेश गुंड, शिवराज्ञी पवार, अर्शान अतार या चार लहानग्यांसह ओम थोरात, प्रगती थोरात, वैष्णवी कुलकर्णी, विवेक पवार, सोनल पवार, साईश्री गुंड, आर्यन गोटणे, सत्यम पवार, समिहा अतार, श्रावणी लोंढे, समर्थ लोंढे या शिक्षक पाल्यांनी सहभाग घेतला. या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पोस्टर झळकावत कोरोना म्हणजे ‘कोई रोड पर ना निकले’ असा संदेश दिला होता. तसेच अनेक जण आपल्या नावातील वा आडनावातील अद्याक्षरांपासूनही असे संदेश देताना दिसत आहेत. यातूनच ही कल्पना सूचली. या उपक्रमात १५ मुला-मुलींनी घरातूनच जागृती संदेश देणारे पोस्टर झळकावले. - रवींद्र देबडवार, शिक्षक, शेटफळ झेडपी शाळा