सोलापूर : हत्तरसंग कुडल येथील मराठीतील पहिला शिलालेख शोधून काढणारे प्रख्यात शिलालेख वाचक, इतिहास संशोधक आनंद नागप्पा कुंभार (वय ७९) यांचे निधन झाले. गुरुवारी दुपारी त्यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांनी डॉक्टरांकडे तपासणीही केली होती. आराम करत असताना झोपेतच दुपारी चार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
शुक्रवारी दुपारी एक वाजता रूपाभवानी मंदिर येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.आनंद कुंभार यांचा जन्म २७ मे १९४१ रोजी सोलापुरात झाला. त्यांचे शिक्षण डी. एच. खजिनदार स्कूल, नगरपालिका मुलांची मराठी शाळा, विद्यामंदिर नाईट हायस्कूल येथे झाले. मातृभाषा कन्नड असताना त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी या विषयांचे ज्ञान होते. त्यांनी १९६० ते १९६४ मध्ये भारतीय सैन्य दलातील ठाण्यामध्ये बिनतारी संदेश वाहकाचे काम केले. १९६५ ते १९६८ दरम्यान सोलापूर इलेक्ट्रिकल अंडरटेकिंगमध्ये रोजंदारीवर काम केले. १९६८ ते १९९९ दरम्यान महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ शहर विभागात कनिष्ठ लिपिक (मीटर वाचक) म्हणून काम केले. १९९९ मध्ये ते सेवानिवृत्त झाले.
सोलापूर जिल्ह्यातील शिलालेखांवर ‘संशोधन तरंग’ हा त्यांचा स्वतंत्र ग्रंथ प्रसिद्ध आहे. या ग्रंथास राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा १९८८ सालचा यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार मिळालो. डॉ. श्रीनिवास रित्ती यांच्यासमवेत ‘इंस्क्रिप्शन्स फ्रॉम सोलापूर डिस्ट्रिक्ट’ हा ग्रंथ लिहिला आहे. शंभराहून जास्त त्यांचे संशोधनपर लेख नामवंत नियतकालिक आणि वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना सैन्य सेवा मेडल, १९८८ मध्ये यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार, १९९५ मध्ये सोलापूर महानगरपालिकेचे गौरवपत्र देखील मिळाले होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून २०१९ चा जीवनगौरव पुरस्कार आनंद कुंभार यांना देण्यात आला. त्यांचे अनुकरण करत आज अनेक तरुण शिलालेखांचा अभ्यास करत आहेत. त्यांच्यासाठी आनंद कुंभार हे आदर्श अभ्यासक होते.
असा लागला शिलालेखांचा ध्यास..- मीटर वाचक म्हणून नोकरी करताना आनंद कुंभार यांना शेतावरील विद्युत पंपाच्या मीटर वाचनाकरिता अनेक ठिकाणी पायपीट करावी लागली. त्यातूनच त्यांना विविध ठिकाणी विखुरलेले शिलालेख दिसले. शिलालेखांच्या शोधाचा व वाचनाचा ध्यास त्यांना लागला. या कोरीव लेखाबद्दल त्यांना आकर्षण वाटले. त्यामुळे त्यांनी डॉ. वि. वा. मिराशी आणि त्यानंतर डॉ. तुळपुळे यांनी संपादित केलेल्या शिलालेखांवरील अनेक पुस्तके, ग्रंथ वाचून काढले. त्यांचा मनापासून अभ्यास केला आणि त्यानंतर एक शिलालेख अभ्यासक, संशोधक म्हणून त्यांच्या व्यक्तिक्तमत्त्वाची जडणघडण झाली. सोलापूर जिल्हा हे त्यांनी आपले अभ्यास क्षेत्र निश्चित केले. संपूर्ण सोलापूर जिल्हा त्यांनी पिंजून काढला. त्यांनी जवळपास चारशे खेड्यांना भेटी दिल्या. (व्हिलेज टू व्हिलेज सर्व्हे) आणि १०० पेक्षाही जास्त कन्नड, मराठी आणि संस्कृत भाषेतील शिलालेख वाचले आणि प्रसिद्ध केले.