सोलापूर :
नॅशनल मेडिकल कमिशनने सोमवारी येथील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची तपासणी केली आहे. महाविद्यालयातील एकूण नऊ विभागांची तपासणी झाली असून, तपासणीचा अहवाल केंद्रीय आरोग्य विभागाकडे सादर होणार आहे. ही तपासणी दर पाच वर्षांनी केली जाते. नियमित तपासणी असून, नऊ विभागांतील कामकाजाची माहिती कमिशनला दिली आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली आहे.
नॅशनल मेडिकल कमिशनच्या नऊ सदस्यांनी सोमवारी महाविद्यालयाचा परिसर तसेच सिव्हिलमधील रुग्णसेवेचा आढावा घेतला. उपलब्ध मनुष्यबळ तसेच रुग्णांची संख्या याची माहिती घेतली. औषध भांडारांत जाऊन उपलब्ध औषधांची माहिती घेतली. महाविद्यालयाच्या पदव्यूत्तर विभागाची तपासणी केली. महाविद्यालयातील प्राध्यापकांशी संवाद साधला. त्यांच्या कामकाजाची माहिती घेतली.